बॉलिवूडमधील एक लोकप्रिय व हटके स्टायलिंगसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपल्या अभिनयाने व नृत्यशैलीने ओळखली जाणारी अभिनेत्री तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलिन मनी लाँड्रिंगच्या प्रकरणी चांगलीच चर्चेत आली होती. २०० कोटींच्या याच मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईडीने अभिनेत्रीला १० जुलै रोजी चौकशीसाठी समन्स पाठवले असून जॅकलिनला सकाळी ११ वाजता ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
यापूर्वी, ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की, जॅकलिन फर्नांडिसला सुकेशच्या फसवणुकीबद्दल सर्व काही आधीच माहित होते. आशातच आता या प्रकरणी जॅकलिनची चौकशी केली जाणार आहे. सुकेश चंद्रशेखरबरोबरच्या या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सुकेश व जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध याआधी आरोपपत्र दाखल केले होते. जॅकलिनवर फोर्टिस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिवेंद्र सिंह यांची पत्नी आदिती सिंग यांच्याकडून २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
यापूर्वीही ईडीने जॅकलिनची अनेकदा चौकशी केली आहे. तसेच २०२१मध्ये नोंदवलेल्या निवेदनामध्ये, जॅकलिन फर्नांडिसने सांगितले होते की, सुकेश चंद्रशेखरने तिला तीन डिझायनर बॅग, जिम वेअरसाठी गुच्ची ब्रॅंडचे कपडे, महागडे शूज, सुपर लक्झरी ब्रँडचे ब्रेसलेट, बांगड्या, रोलेक्स आणि डायमंडच्या भेटवस्तू दिल्या होत्या. आरोपपत्रातील आरोपांनुसार, सुकेशने जॅकलीनशी मैत्री केल्यानंतर तिला अनेक महागडे गिफ्ट्स दिल्याची कबुलीही दिली आहे.
हेही वाचा – “मालिका बघण्यातच रस नाही”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, “फक्त फालतूपणा…”
दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये जॅकलीन फर्नांडिसने या प्रकरणी तिच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात तिचा कोणताही सहभाग नसल्याचे जॅकलिनने सांगितले होते. जॅकलिन सध्या जामिनावर बाहेर आहे. याशिवाय महादेव बेटिंग ॲप प्रकरणातही जॅकलिनचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता जॅकलिनवर काय कार्यवाही केली जाणार यांची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.