Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. ३ जानेवारीला आयरा खानने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह नोंदणी पद्धतीने लग्न केले. यानंतर आता उदयपूरमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा उरकणार आहे. आयराच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. लेकीच्या लग्नसोहळ्यसाठी आमिरची लगबगही पाहायला मिळत आहे. लेकीच्या लग्नसोहळ्यात आमिरचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात तो हातावर मेहंदी काढून घेताना दिसत आहे.
आयराचा मेहंदी सोहळा सोमवारी अगदी थाटामाटात पार पडला. यावेळी आमिर खाननेही हातावर मेहंदी काढून घेतल्याचं पाहायला मिळालं. लेकीच्या मेहंदीसाठी आमिरने निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा व त्यावर नेहरू जॅकेट परिधान केलं होत.समोर आलेल्या फोटोमध्ये आमिर मेहंदी काढून घेत असताना आयराही वडिलांच्या शेजारी बसलेली पाहायला मिळाली. आयराने तिच्या मेहेंदी समारंभासाठी ऑफ व्हाईट रंगाचा हॉल्टर नेक असा ड्रेस परिधान केला होता. यावर तिने महागडे दागिने परिधान केलेले पाहायला मिळाले.
आमिर खानचा त्याची लेक आयरासह खास बॉन्ड आहे. मुलीच्या लग्नासाठी तो खूप उत्सुक दिसत आहे. संगीत सोहळ्यात त्याने मुलीसाठी खास परफॉर्मन्स केल्याचा व्हिडीओही समोर आला. यावेळी त्याने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण व मुलगा आझाद यांच्यासह आयरासाठी एक गाणे गायले. आयरा आज उदयपूरमध्ये एका भव्यदिव्य पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चार-पाच दिवसांपासून येथे लग्नापूर्वीची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने केलेलं आयरा व नुपूरचं लग्न खूप चर्चेत राहिलं. नुपूर लग्नाच्या मिरवणुकीत धावत लग्नमंडपापर्यंत पोहोचला होता. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तो तब्बल ८ किलोमीटर धावला. यावेळी त्याने जिमच्याच कपड्यांवर लग्न केले.
आयरा व नुपूरचा संगीत सोहळ्यातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आयरा व नुपूर यांचा मेहंदी सोहळ्यातील लूकही समोर आला. यावेळी आयराने डिझाइनर घागरा चोळी व त्यावर टोपी असलेलं वेलवेटच जॅकेट परिधान केलं होत. तर नुपूरने सूट बूट व ब्लेझर परिधान केला होता. दोघांचाही हा लूक लक्षवेधी होता.