हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर व त्याच्या दोन मुलींचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्थानिक पोलिसांच्या अहवालानुसार, अभिनेत्याचे छोटे विमान टेकऑफच्यावेळी काही क्षणांतच कॅरेबियन समुद्रात कोसळले. गुरुवारी एका छोट्या खासगी विमानाने प्रवास करत असताना, हा अपघात घडला आणि या अपघातात अभिनेत्यासह त्याच्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Christian Oliver Death News)
यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे उपस्थित असलेल्या मच्छीमार व तटरक्षकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून, चारही मृतदेह बाहेर काढले आहेत. या विमानाने प्रवास करत असलेला ५१ वर्षीय अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर, त्याच्या मुली मदिता (१० वर्षे) व अॅनिक (१२ वर्षे) यांच्यासह पायलट रॉबर्ट सॅक्स यांचादेखील अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचे हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सेंट लुसियाला जाणार होते. पण टेकऑफच्यावेळी कॅरेबियन समुद्रात त्यांचे विमान कोसळले.
आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”
नुकतंच ख्रिश्चन ऑलिव्हर याने इन्स्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्याचा फोटो व त्याला हटके कॅप्शन देत आपण कुटुंबाबरोबर सुट्टीवर असल्याची माहिती दिली होती. नवीन वर्षानिमित्त ऑलिव्हर त्याच्या परिवारासह सुट्टीवर गेला होता आणि याचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा – “आगीत तेल ओततात पण…”, ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असण्याच्या चर्चांवरुन पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला, “त्या घरात…”
दरम्यान, ऑलिव्हर हा टॉम क्रूझच्या ‘वाल्कीरी’ या चित्रपटामध्येही झळकला होता. त्याच्या ‘सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास’ आणि चित्रपट ‘द बेबी-सिटर्स क्लब’मध्ये साकारलेल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. ऑलिव्हरने लोकप्रिय जर्मन कॉप शो ‘अलार्म फर कोब्रा ११’च्या दोन सीझन्समध्ये काम केले होते.