Santosh Juvekar On Sword Back In India : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक श्रीमंत रघुजी राजे भोसले (प्रथम) यांची ऐतिहासिक तलवार जी बरीच वर्ष लंडनमध्ये होती ती अखेर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी ही तलवार मुंबईत आणण्यात येईल. याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली. २८ एप्रिल रोजी या तलवारीचा लिलाव ब्रिटन मधल्या सोथब्रेज या संस्थेद्वारे होत असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य सरकारने या लिलावात आपला सहभाग नोंदवला होता. यादरम्यान काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ही तलवार खरेदी करण्यात आली. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे.
तालवारीबाबत मोठी अपडेट समोर येताच प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. आणि सगळेच हा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशातच ‘छावा’ फेम संतोष जुवेकरनेदेखील या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला. यांत त्याने असं म्हटलं की, “छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्याचे थोर सरदार आणि आपल्या नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांच्या शौर्याची अभिमानाची आणि आपल्या मराठ्यांची ओळख असलेली तलवार अधिकृतरित्या लंडनहून आपल्या मातीत परत येत आहे, आपल्या महाराष्ट्रात येत आहे. ही तलवार महाराष्ट्र सरकारने लीलावात जिंकली असून आपला ऐतिहासिक वारसा मायदेशी परत येत आहे. हा अभिमानाचा क्षण शक्य केल्याबद्दल माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष जी शेलार साहेब, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सरकारचं मनापासून मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार जय महाराष्ट्र जय शिवराय”.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करुन माहिती दिली होती. त्यात त्यांनी लिहिले होते की, “नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला आनंद होतो. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती.
पुढे त्यांनी लिहिलं, “रघुजी भोसले यांनी १७४५ च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार आहे. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. १८१७ मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे”.
आणखी वाचा – नेहमीच चर्चेत तरीही कामासाठी वणवण; हिना खानची खंत, म्हणाली, “कर्करोग झाला तेव्हापासून…”
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे, हे सांगताना मला आनंद होतो. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 29, 2025
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू… pic.twitter.com/rQlt06cKme
रघुजी भोसले हे १६९५ ते १७५५ या काळात नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक व छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले मराठा सैन्याचे एक महत्त्वाचे सरदार होते. शाहू महाराजांनी त्यांना सेनासाहिबसुभा ही पदवी बहाल केली होती. रघुजींनी १७४५ ते १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धाचे नेतृत्व करुन मराठा साम्राज्याचा बंगाल ते ओडिषा पर्यंत विस्तार केला होता. याशिवाय त्यांनी चांदा, छत्तीसगड, संबळपूर यांसारख्या प्रदेशांवरही आपले वर्चस्व गाजवले.





