Phullwanti Movie : अभिनय, उद्योजिका, सुत्रसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘फुलवंती’ या चित्रपटाची अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घोषणा केली होती. शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती ‘फुलवंती’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पेशवाईत लोककला आणि लोककलावंत यांना मोठा राजाश्रय मिळत असे, याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात जात असे. मुघल दरबारात कला सादर करणारी ‘फुलवंती’ आपल्या अस्मानी सौंदर्य आणि मनमोहक नृत्याने सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न का करते? या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून उलगडणार आहे. (Phullwanti Movie Review)
व्यंकट शास्त्री (गश्मीर महाजनी) भर दरबारात फुलवंतीचा (प्राजक्ता माळी) अपमान करतात. बेताल वेश्या म्हणत ते तिचा आणि कलेचा अपमान करतात. या अपमानाचा बदला म्हणून फुलवंती शास्त्रींना सर्वांसमक्ष खुले आवाहन देते आणि या आवाहनाचा व्यंकट शास्त्री स्वीकार करतात. फुलवंती शास्त्रींना आवाहन देत असं म्हणते की, “मी या दरबारात एक घटिका न थांबता नृत्य करत राहीन आणि या नृत्यामध्ये माझ्याकडून चुका झाल्या तर मी आजन्म तुमची दासी म्हणून राहीन”. फुलवंतीच्या या आवाहनाचा शास्त्री स्वीकार करतात. पण या नृत्यासाठी मी स्वत: पखवाज वादन करणार असल्याची अट ठेवतात. त्यामुळे शास्त्र आणि कलेच्या या संघर्षात कुणाचा विजय होतो याची गोष्ट म्हणजे ‘फुलवंती’.
चित्रपटाच्या आणखी जमेच्या बाजू म्हणजे पार्श्वसंगीत, नृत्य, कलादिग्दर्शन, छायाचित्रण आणि समस्त कलाकारांचा सशक्त अभिनय. मार्तंड भैरवाचार्य (वैभव मांगले) व गुरुमाई (चिन्मयी सुमित) हे कलाकार अगदी भाव खाऊन गेले आहेत. चित्रपटाच्या मध्यांतरात येणारे हे कलाकार प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतात. तसंच चित्रपटातील नृत्यामुळे प्राजक्ताही लक्षवेधी ठरते. वैभव मांगले व चिन्मयी सुमित यांच्याबरोबरच प्रसाद ओक, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, हृषिकेश जोशी, निखिल राऊत, दीप्ती लेले आणि जयवंत वाडकर आदि मराठीतील नामवंत कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.
दरम्यान, ‘फुलवंती’चे संवादलेखन प्रविण तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल तरडे यांचे आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत अविनाश-विश्वजीत यांनी केलं आहे. तर चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रॉडक्शन, मुरलीधर छटवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. त्यामुळे ‘फुलवंती’मधील पखवाज व घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.