Poet Imroz Passed Away : प्रसिद्ध कवी व चित्रकार इमरोज यांचे वयाच्या ९७व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. वृद्धापकाळाने बरेच दिवस ते आजारी होते. इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग होते. अमृता प्रीतम यांच्याबरोबरच्या नात्यानंतर इमरोज लोकप्रिय झाले होते. मात्र दोघांनी कधीही लग्न केले नाही, परंतु ४०वर्षे ते एकमेकांसह राहिले. इमरोज यांच्या निधनाचे वृत्त कळताच कॅनडातील इक्बाल महल यांनी शोक व्यक्त केला की, ते त्यांना १९७८ पासून वैयक्तिकरित्या ओळखत आहेत. अमृता त्यांना ‘जीत’ या नावाने हाक मारायची, असेही ते म्हणाले.
इमरोज यांचा जन्म १९२६ मध्ये लाहोरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झाला. इमरोजने जगजीत सिंग यांच्या ‘बिरहा दा सुलतान’ आणि बीबी नूरनच्या ‘कुली रह विचार’सह अनेक प्रसिद्ध एलपीचे मुखपृष्ठ डिझाइन केले होते. अमृता त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन करण्यासाठी कोणालातरी शोधत असताना एका कलाकाराच्या मार्फत इमरोज यांची भेट अमृतासह झाली. अमृता प्रीतम यांनी पंजाबी व हिंदी भाषेत अनेक कविता, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी १००हून अधिक पुस्तके लिहिली.
१९३५ मध्ये अमृता यांचे लग्न लाहोरचे व्यापारी प्रीतम सिंग यांच्याशी झाले. १९६० मध्ये त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर अमृता प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या प्रेमात पडली, पण साहिर यांच्या आयुष्यात आलेल्या एका महिलेमुळे दोघेही एकत्र राहू शकले नाहीत. यानंतर अमृताच्या आयुष्यात चित्रकार व लेखक इमरोज आले, जे अमृताच्या प्रेमात पडले. असं म्हणतात की, अमृता अनेकदा इमरोज यांच्या पाठीवर बोटांनी साहिर यांचं नाव लिहायच्या. इमरोज यांना हे माहीत होतं, पण त्यांचा स्वतःच्या प्रेमावर जास्त विश्वास होता. अमृता म्हणायच्या, “साहिर माझ्या आयुष्याचे आकाश आहेत आणि इमरोज माझ्या घराचे छप्पर आहेत”.
काही वर्षांपूर्वी इमरोज यांनी अमृता व साहिर यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की,”मला वाटत नाही की अमृता व साहिर लुधियानवी एकमेकांवर खरे प्रेम करतात. तो अमृताला भेटायला कधीच दिल्लीला आला नाही. अमृताही त्याला भेटायला मुंबईत गेली नाही. साहिर हा कौटुंबिक माणूस नव्हता आणि हे अमृताला माहित होतं. अमृता आणि मी मित्रांप्रमाणे वेगळ्या खोलीत राहायचो आणि खर्च वाटून घ्यायचो”. अमृता व इमरोज यांच्या वयात सात वर्षांचा फरक होता. २००५ मध्ये अमृता यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी अमृता यांनी इमरोज यांच्यासाठी ‘मी तुला पुन्हा भेटेन’ अशी कविता लिहिली होती.