Rohini Ninawe Struggle Period : मराठी-हिंदी मालिकांच्या सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांचा लेखन प्रवास वाखाणण्याजोगा आहे. मराठी भाषेतील पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनी’ रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे. आतापर्यंत त्यांनी ७२ मालिकांच्या तब्बल १२ हजारपेक्षा जास्त भागांचे लेखन केले आहे. ‘दामिनी’, ‘अवंतिका’, ‘अवघाची संसार’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अग्गं बाई सासूबाई’, ‘मुलगी झाली हो’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा गाजलेल्या मराठी मालिकांच्या लिखाणाची जबाबदारी रोहिणी यांनी सांभाळली आहे. तर ‘कुसुम’, ‘संजीवनी’, ‘इस प्यार को मै क्या नाम दू’, ‘दिल से दिया वचन’, ‘प्यार का दर्द है’, ‘यहाँ मैं घर घर खेली’ अशा हिंदी मालिकांचे लेखनही त्यांनी केले आहे.
लिखाणाबरोबरच त्या उत्तम अभिनेत्रीही आहेत. अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या उत्तम आणि दर्जेदार लिखाण असलेल्या लेखिकेचा इथवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आयुष्यात त्यांनी यश संपादन करण्यासाठी अनेक अडथळे पार केले आहेत. एकीकडे लिखाणाची जबाबदारी दुसरीकडे आईचं आजारपण तर अचानक झालेलं वडिलांचं निधन इतके मानसिक त्रास सहन करत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय टप्पा पार केला. रोहिणी निनावे यांनी ‘मज्जा पिंक’ दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या कठीण काळाबाबत भाष्य केलं आहे.
रोहिणी म्हणाल्या, “लिखाणाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. आणि ही माझी परीक्षाच होती. अक्षरशः हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून मी लिखाण केलं आहे. माझं स्क्रिप्ट लिहिलं आहे, सकाळी एक माणूस येऊन ते स्क्रिप्ट घेऊन जायचा. अतिशय संघर्षमय हा काळ होता. लोकांचे अनेक टोमणे तेव्हा कानावर यायचे. त्यावेळी दामिनी मालिकेच्या लिखाणाचं काम माझ्याकडे होतं. आणि त्यात आईचं आजारपणही आलं. आईला रक्ताच्या उलट्या व्हायच्या तिचं आजारपण तेव्हा सुरु होतं. वडिलांचं अचानक निधन झालं. त्यावेळी मला मोठ्या प्रमाणात मानसिक संघर्षाला तोंड द्यावं लागलं”.
आणखी वाचा – रेश्मा शिंदेचा नवरा पवन नक्की काय काम करतो?, युकेमध्ये राहत होता पवन, अभिनेत्रीचं पहिल्यांदाच भाष्य
पुढे त्या म्हणाल्या, “आईची काळजी एकीकडे, हॉस्पिटलच्या वाऱ्या आणि लिखाण हे सगळं एकत्र सुरु होतं. हॉस्पिटलमध्ये मिणमिणत्या दिव्याखाली बसून अक्षरशः दामिनी मालिकेचे संवाद लिहिले आहेत. आम्हाला डेडलाईन असते. इकडे कोणी डेड होत असलं तरी आम्हाला ते काम पूर्ण करावंच लागतं. आईच्या आजारपणाला पैसे कमवायचे होते त्यामुळे मी लिखाण बंद केलं नाही. आणि आलेली परिस्थिती मला सांभाळून घ्यावी लागली. एखाद्यावेळी प्रसंग ओढवतो तेव्हा आपोआप आपण खंबीर होतो”.