मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये गश्मीर महाजनीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. काही दिवसांपूर्वीच महाजनी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गश्मीरचे वडील व सुप्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झालं. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. वडिलांना सांभाळलं नाही, शेवटच्या क्षणी वडिलांबरोबर राहत नसल्याचे आरोपही गश्मीरवर करण्यात आले. मात्र गश्मीरने या सगळ्याबाबत स्पष्टीकरण देणं टाळलं. आता नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी गश्मीरने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.
नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होण्यास सुरुवात केली. गश्मीरनेही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक संतप्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे त्याने नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सोशल मीडियाद्वारे बोलणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
गश्मीर म्हणाला, “नितीन सरांनी आत्महत्या केली. अनेकजण याबाबत व्यक्त झाले आहेत. स्वतःचं मत तयार न करता शोक व्यक्त करणं कठीण आहे का? विशेषतः तेव्हा जेव्हा कोणाचं निधन होतं. तज्ज्ञांप्रमाणे लोक आपली मतं मांडतात. पण यादरम्यान त्यांचं कुटुंब कोणत्या वेदनेमधून जात असतं याची तुम्हाला कल्पना तरी असते का?”.

“जर हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मुकाटपणे श्रद्धांजली का वाहत नाही? तुमच्या आजुबाजुचे लोक तुमच्या मताला किंमत देत नाहीत म्हणून तुम्ही ऑनलाईन काहीही बरळता…” गश्मीरच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.