कलाक्षेत्रात येणारा प्रत्येक कलाकार मेहनत करण्यासाठी तयार असतो. एखादी भूमिका वाट्याला आली की, त्याचं सोनं कसं करायचं? ते तो चोख ओळखतो. मात्र काही कलाकारांच्या पदरी जेव्हा निराशा येते तेव्हा त्यामधून स्वतःला कसं सावरायचं? ही मोठी परिक्षाच असते. कित्येकदा अमुक कलाकाराने आत्महत्या केली, नैराश्यामुळे जीवन संपवलं अशा घटना कानावर येतात. तर कधी कलाकारांचं निधन होताच त्याची हत्या केली असल्याचे आरोप करण्यात येतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. ‘फॅमिली मॅन’ या बहुचर्चित वेबसीरिजमध्ये काम करणारा अभिनेता रोहित बसफोरचा मृत्यू झाला आहे. पण हा संपूर्ण हत्येचा कट असल्याचं बोललं जात आहे. (family man webseries actor death)
आत्महत्या की, हत्येचा कट?
रोहित रविवारी (२७ एप्रिल) गरभंगा जंगलमध्ये मित्रांबरोबर फिरायला गेला होता. त्यानंतर त्याच्या निधनाचीच बातमी समोर आली. गरभंगा जंगलामध्ये त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासानुसार हा हत्येचा कट असल्याचं समोर आलं आहे. शिवाय रोहितच्या कुटुंबियांनीही त्याची हत्याच झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
जंगलात मित्रांसह गेला अन्…
रविवारी दुपारी रोहित त्याच्या मित्रांसह जंगलात फिरायला गेला. दुपारी १२.३०च्या सुमारास तो घरातून निघाला. एका ट्रीपला जात असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं. रोहितचा काहीच संपर्क होत नव्हता. याचीच कुटुंबियांना चिंता होती. सगळेच अस्वस्थ झाले. रोहितच्याच एका मित्राने ही घटना त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवली. त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच रोहितला मृत घोषित करण्यात आलं.
शरीरावरही जखमा कारण…
मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी रोहितला नेण्यात आलं. यामध्ये त्याच्या शरीरावर खुणा व जखमा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. डोकं, चेहरा व शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या असल्याचं यामधून समोर आलं. कुटुंबियांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका पार्किंगवरुन रोहितचे वाद झाले होते. कुटुंबियांनी ज्या व्यक्तींची नावं घेतली ते आता फरार आहेत. मात्र या घटनेमुळे रोहितचं कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेलं आहे.