अभिनेता रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित ‘वीर सावरकर’ या बायोपिकमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही रणदीपने स्वीकारली आहे. मात्र याआधी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे होती. मात्र जेव्हा रणदीपने चित्रपटाच्या कथानकाला घेऊन गोष्टी बदलल्या तेव्हा महेश यांनी हा चित्रपट दिग्दर्शित न करण्याचा निर्णय घेतला. महेश यांनी नेमका ‘वीर सावरकर’ हा चित्रपट का सोडला यामागचं कारण समोर आलं, त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे. (Mahesh Manjrekar on Randeep Hooda)
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत महेश यांनी सांगितले की, “सुरुवातीला रणदीप हुड्डाने सावरकरांच्या व्यक्तिरेखेबद्दल केलेलं संशोधन, त्या व्यक्तिरेखेचा केलेला अभ्यास पाहून मी भारावून गेलो. जेव्हा मी रणदीपला भेटलो तेव्हा मी पाहिले की तो खूप प्रामाणिक आहे. त्यानंतर आम्ही बरेचदा भेटलो. या भेटीदरम्यान मला कळलं की, त्याने स्वातंत्र्यलढा, महायुद्ध यावर अनेक पुस्तके वाचली होती. त्याबद्दल तो बोलायचा, तेव्हा मला त्याचं कौतुक वाटायचं”.
पाहा महेश मांजरेकर रणदीप हुडाबद्दल काय म्हणाले (Mahesh Manjrekar on Randeep Hooda)
त्यांनतर ते म्हणाले की, “रणदीपला कथानकातील काही मुद्द्यांवर आक्षेप होते. याबद्दल त्याने मला सांगितलं तेव्हा मी म्हणालो, की आता काही बदल केले तर चित्रपटात अडचण येईल. यावर तो म्हणाला, एकदा का स्क्रिप्ट फायनल झाली की मी कोणताच प्रश्न करणार नाही”. यावरून महेश यांना जाणवलं की, रणदीपला त्याच्या डोक्यातील गोष्टी चित्रपटात आणायच्या आहेत. याबद्दल महेश म्हणाले की, “रणदीपला या चित्रपटात हिटलर, इंग्लंडचा राजा, ब्रिटिश मंत्री यांचा समावेश करायचा होता”. आणि हे काही एक दिग्दर्शक म्हणून महेश यांना पटलं नव्हतं.
यापुढे बोलताना महेश म्हणाले, “रणदीपच हे बोलणं काही मला पटत नव्हतं. आता तो मला सांगणार का चित्रपट कसे बनतात”. मी स्पष्टपणे म्हणालो, “मी माझ्या पद्धतीने दिग्दर्शन करणार. मला हेसुद्धा जाणवलं की, तो मला माझ्या पद्धतीने काम करू देत नव्हता. यादरम्यान मी चित्रपटाच्या निर्मात्यांनाही भेटलो, आम्ही दोघेही या चित्रपटात असलो, तर हा चित्रपट होणार नाही. एकतर मी या चित्रपटात असेन किंवा तो तरी”, असं मी निर्मात्यांना स्पष्ट बोललो.
महेश यांनी पुढे सांगितले, “मी प्रार्थना करतो की त्यांनी एक उत्तम चित्रपट तयार केला आहे. आम्ही भारतीय इतिहासाचे खूप खराब विद्यार्थी आहोत. रणदीपला या चित्रपटात लोकमान्य टिळकांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी जगवणार आहे’ याचा देखील समावेश करायचा आहे. हे सर्व सावरकरांच्या जीवनपटाला कसे लागू होईल हा मुळात प्रश्न मला पडला आहे. सावरकरांवर बायोपिक बनवायला हवं असं माझं म्हणणं होतं. त्यामुळे यांत मूळ फोकस हा आपण सावरकर यांच्याकडे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.”