Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji Serial : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे विकी कौशलच्या छावा चित्रपटाची. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान पाहायला मिळत आहे. त्यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु असताना एकीकडे डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मालिकेत महाराजांच्या बलिदानाचा शेवटचा भाग दाखवला नाही यावरुन अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का?, राजकीय वा इतर काही दबाव होता का?, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावर आता डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, “‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपून आता पाच वर्षांहून अधिकचा काळ झाला. तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली आहे. या यशात चाहत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या थिएटरमध्ये असलेला ‘छावा’ चित्रपट अतिशय उत्तम आहे. तो पाहण्याचे मी आवाहन केलेले आहेच. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्ष दडवलेला इतिहास समोर येत आहे. अंधाऱ्या कोठडीत डांबला गेलेला इतिहास यानिमित्ताने उजळून निघाला. पण सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी या ट्रोलर्सना फारशी किंमत देत नाही. पण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे उत्तर देणे भाग वाटते”.
आणखी वाचा – “तो नशेत आहे”, सैफ अली खानच्या लेकाचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं, म्हणाले, “हे वागणं…”
राजकीय वा इतर दबावाबाबत बोलताना ते म्हणाले, “‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखविण्याचा माझ्या आणि माझ्या टीमवर दबाव होता, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत. पण हा दबाव माध्यमांचा होता. कारण सदर मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होत होती. त्यामुळे रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आलेली आहेत. snp ची काही मार्गदर्शक तत्वे होती जी आम्हाला पाळावी लागली. त्यामुळे हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवले जावे, याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन मालिकेचा शेवट दाखविण्यात आला. त्यामुळे टेलिव्हिजनवर तितका असा हिंसाचार दाखवता येत नाही. मालिकेत या मर्यादा मोठ्या प्रमाणात होता”.
पुढे ते असंही म्हणाले, “दुसरा दबाव होता तो म्हणजे नैतिक दबाव. टेलिव्हिजनवर असे भाग प्रदर्शित करताना त्याचा प्रेक्षकवर्ग २ वर्षाच्या लहान मुलांपासून सुरु होतो. बरेचदा एखादा भाग सुरु असताना तो सीन संपायला तीन एक दिवस लागतात त्यामुळे प्रेक्षक ते तीन दिवस या सीनच्या आहारी जातात आणि स्वतःला त्रास करून घेतात. या सगळ्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल याची नैतिक जबाबदारी चॅनेलवर अधिक असते. महिला, चिमुकल्यांच्या मनावर याचे किती परिणाम होतील याची नैतिक जबाबदारी ही आमची होती. छत्रपत्री महाराजांवर होणारे हे अत्याचार किती दाखवावेत ही जबाबदारी आम्ही सांभाळली. हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर दाखवले तर ते तुम्हाला पाहायला आवडेल का?, असे मालिकेच्या शेवटच्या भागांच्या प्रक्षेपणाबाबत प्रश्न विचारणार्यांबद्दल प्रचंड चीड येते. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर होणारे अत्याचार पाहायचे होते का?, कशासाठी पाहायचे होते?, यातून तुम्हाला आनंद मिळणार होता का?”.