टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या पतीसह क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. विवेक दहियाबरोबर ती युरोप येथे फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. युरोपमध्ये दिव्यांका व विवेक यांच्यासह एक मोठी घटना घडली आहे. दिव्यांका व विवेक त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोपला गेले होते. युरोप येथे त्यांनी खूप धमाल मस्ती केली. लग्नाचा वाढदिवसही त्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला. पण यावेळी अभिनेत्रीसह खूप मोठी घटना घडली आहे. यावेळी अभिनेत्रीचा कोणीतरी तिचा पासपोर्ट, पर्स आणि दहा लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरल्या. यामुळे आता दिव्यांका व विवेक पासपोर्टशिवाय युरोपमध्ये अडकले असल्याचं समोर आलं आहे. (Divyanka Tripathi Robbed Of Money)
या घटनेबद्दल बोलताना विवेकने ‘इटाइम्स’ला सांगितले की, “आम्ही काल फ्लॉरेन्सला पोहोचलो. इथे एक दिवस मुक्काम करु असे वाटले. त्यामुळे आम्ही आमच्या मुक्कामासाठी प्रॉपर्टी पाहू लागलो आणि आमचे सर्व सामान बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये ठेवले. पण जेव्हा आम्ही आमचे सामान घेण्यासाठी परत आलो तेव्हा आम्हाला आढळले की कोणीतरी कार फोडून आमचे सर्व सामान चोरले होते”.
या घटनेनंतर विवेकने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, मात्र कोणतीही मदत त्यांना मिळाली नाही. याबाबत बोलताना तो म्हणाला, “आम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत त्यामुळे ते आम्हाला मदत करु शकणार नाहीत. त्यानंतर आम्ही दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्यांचेही ऑफिस बंद झाले होते”.
विवेक पुढे म्हणाला, “फ्लोरेन्सजवळ एक छोटे शहर आहे. आम्ही तिथे राहतो. हॉटेलचे कर्मचारी आम्हाला खूप मदत करत आहेत, पण आम्हाला दूतावासाच्या मदतीची गरज आहे. भारतात परत येण्यासाठी आम्हाला तात्पुरता पासपोर्ट आणि या दूतावासाची गरज आहे. आमच्याकडे रोखदेखील शिल्लक नाही”.