कलाक्षेत्रात काम करायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही, असं कलाकार ठामपणे सांगतात. पण या चंदेरी दुनियेची दुसरी बाजूही पाहायला मिळते. काम करायचं असेल तर समोरच्या व्यक्तीबरोबर संयमाने व चांगल बोलूनच राहावं लागतं असं कित्येक कलाकार मंडळी स्वतःहून सांगतात. याचा अनुभवही अनेक कलाकारांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये बोलून दाखवला. आता याचविषयी दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीत तोंडावर कौतुक मागून मात्र एकमेकांचा राग करत असल्याचं विवेक यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी रणबीर कपूरचाही उल्लेख केला. ‘एनिमल’ चित्रपट खराब असं तोंडावर म्हणण्याची कोणाचीही हिंमत नाही असं विवेक यांचं म्हणणं आहे. (vivek agnihotri talk about bollywood)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक यांनी अनेक दावे केले. इंडस्ट्रीमधील बऱ्याच लोकांनी बड्या कलाकारांच्या बाबतीत पाठून खूप काही चर्चा केली आहे. पण या कलाकारांच्या तोंडावर बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही असं विवेक यांचं म्हणणं आहे. रणबीरच्या ‘एनिमल’ चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, “चित्रपट खराब आहे असं त्याच्या तोंडावर बोलण्याची कोणाचीच लायकी नाही. ते अशी हिंमत करुच शकत नाहीत”. ते म्हणाले, “एखादा निर्माता किंवा दिग्दर्शकाचं नाव सांगा ज्याने बड्या कलाकाराविषयी कधीच वाईट बोललेलं नाही. पण ते सगळे कॅमेऱ्यासमोर येऊन बोलतात का?. तर याचं उत्तर आहे नाही”.
“त्यामुळे ते हे सगळं भोगण्याच्याच लायकीचे आहेत. घाणेरड्या कामाचे त्यांना पुन्हा १५० कोटी द्या. घाणेरड्या अभिनयाचे इतके पैसे देतात. या सगळ्या प्रकरणात मोठी नावं आहेत तोपर्यंत बॉलिवूड घाणेरडं कामच प्रेक्षकांसमोर आणणार आहे”. जे मेहनतीने काम करतात, उत्तम अभिनय करतात त्यांच्याविषयी विवेक यांना कोणताच राग नाही. त्यांच्याबाबत ते वाईटही बोलत नाहीत.
पुढे ते म्हणाले, “जे लोक स्टारही झाले नाहीत आणि स्टार असल्यासारखे वागतात त्यांचा मला राग येतो. यामुळे बॉलिवूडला खूप मोठं नुकसान होत आहे”. विवेक सध्या इंडस्ट्रीतील बऱ्याच कामांपासून दूर आहेत. त्यांना या क्षेत्रात निर्माण झालेलं वातावरण पटतही नाही. विवेक म्हणाले, “भीती आणि त्याचपोटी कौतुक करण्याची संस्कृती इंडस्ट्रीमध्ये आणखीनच बळकट झाली आहे. निर्माते चांगलं काम करण्यावर लक्ष न देता कलाकारांना खूश कसं ठेवता येईल? यामागे पळत असतात”. विवेक यांनी बॉलिवूडचा खरा आरसा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.