मराठी मनोरंजन सृष्टीतील काही दिग्दर्शकांपैकी गाजलेले एक नाव म्हणजे विजू माने. विजू माने यांनी अनेक धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. पांडू, शर्यत, बायोस्कोप यांसारख्ये अनेक चित्रपट विजू माने यांनी दिग्दर्शित केले आहे. पण युट्यूबवरची त्यांची ‘स्ट्रगलर साला’ ही वेबसीरिजही तुफान गाजत आहे. त्यांची ‘स्ट्रगलर साला’ ही सध्या युट्युबर ट्रेंडींग असणारी सिरिज आहे. तसेच अनेकांच्या देखील पसंतीस ती पडत आहे. (Kushal Badrike Struggle)
या सीरिजमध्ये अभिनेता कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण हे अभिनेतेही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. नुकतीच विजू माने यांनी सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या तिघांचाही खऱ्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितला. त्यातही कुशलने आयुष्यात सगळ्यात जास्त संघर्ष केला आहे असं ते म्हणाले.
कुशलच्या या संघर्षाविषयी सांगताना विजू माने असं म्हणाले की, “संघर्ष हा तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे. म्हणजे संत्या काय, बाबा काय, मी काय पण कुशलचा संघर्ष जास्त आहे. काम मिळवण्यासाठी त्याने केलेली धडपड त्याच्या बायकोने त्याला दिलेली साथ ही सगळं खूपच कमाल आहे. खोटं वाटेल पण कुशलचा संघर्ष जास्त आहे. कुशलविषयी एक किस्सा सांगताना विजू माने यांनी असं म्हटलं आहे की, “कुशलची आणि माझी ओळख होती. त्याचा मावसभाऊ माझ्या नाटकात होता. एकदा असं झालं की कुशलची एकांकिका आहे म्हणून मी एकांकिकेला जाऊन बसलो. तर कुशलचा ५ मिनिटांचा कार्यक्रम झाला आणि त्याची एक्झिट झाली.”
पुढे ते म्हणाले, “अंधार झाला आणि पुन्हा त्याची एंट्री झाली. यावेळेला त्याच्या खांद्यावर एक रुमाल होता आणि मला दीड मिनिटाच्या आत लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. मी नीट बघितलं तर तो सतत त्या रुमालाला तोंड पुसत होता. त्यांच्या तोंडाला पूर्ण रक्त लागलं होतं. गडकरी नाट्यगृहात या विंगेतून त्या विंगेत जात असताना कुशल जोरात एका खांबावर आपटला आणि तिथे त्याचे दोन्ही दात निखळून पडले. एवढं भळाभळा रक्त वाहत होतं. तो दातातून येणारं रक्त रुमालाने दाबायचा, पुढचं वाक्य बोलायचा. असं त्यांने पुढची ३५ मिनिटं एकांकिका केली. समोरच्यांना कळलंही नाही की असं काही झालं होतं. पाण्यासारखं रक्त पिळू शकतो एवढं रक्त त्या रुमालावर होतं आणि हीच त्याची कामाप्रतीची आवड आहे.”