बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वीच जेजुरी येथील खंडोबा देवस्थान येथे या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. (Dharmaveer 2 movie)
‘धर्मवीर २’ चित्रपटाला जेव्हा “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…” अशी टॅगलाईन देण्यात आली, तेव्हा अनेक जण संभ्रमात पडले होते. शिवाय चित्रपटात कोणत्या साहेबांची गोष्ट पाहायला मिळणार आहे, हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र आता चित्रपटाचे निर्माते व अभिनेते मंगेश देसाई यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.
निर्माते मंगेश देसाई यांनी नुकताच ‘एबीपी माझा’शी संवाद साधला होता. त्यावेळी ‘धर्मवीर २’ बद्दल बोलताना म्हणाले, “साधारण नोव्हेंबर महिन्यात ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. त्यात दिघे साहेबांच्या काही गोष्टी पहिल्या भागात पहिल्या आहेत. मात्र या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा ‘हिंदुत्व’ होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटात दाखवणार आहे.”
हे देखील वाचा – क्षिती जोगचं फेसबुक पेज हॅक, अश्लील व्हिडीओ केले शेअर, म्हणाली, “अशा पोस्ट…”
“धर्मवीर” सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या व त्याचा संबध काहींनी थेट चित्रपटाशी जोडला होता. त्यामुळे अनेकांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. यावर बोलताना मंगेश देसाई म्हणाले, “राजकारण आणि चित्रपट हे दोन्ही माझ्यासाठी वेगवेगळे भाग आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपट बनवताना माझा कोणताही अजेंडा नव्हता. मनोरंजनसृष्टीतला एक निर्माता म्हणून मी या सिनेमाची निर्मिती केली आहे. पण, बऱ्याच गोष्टी योगायोगाने घडत असतात. त्यातली ही घडलेली गोष्ट आहे. पण दिघे साहेबांच्या ज्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत, त्या या चित्रपटातून दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल.”
हे देखील वाचा – ‘ताली’ वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या रवी जाधवांची मराठी प्रेक्षकांवर नाराजी, म्हणाले, “मराठी कलाकारांना प्रेक्षकांचा…”
“धर्मवीर २” चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडे हे करणार आहेत. तर अभिनेता प्रसाद ओक यात मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि त्यासाठी त्यांची धडपड दाखवण्यात येणार असल्याने पहिल्या भागाप्रमाणे याला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Mangesh Desai on Dharmaveer 2 movie)