Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात यंदाचे सर्व सदस्य धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात धनंजय पवार या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा खेळ पाहणंही रंजक ठरतंय. डीपी घरातील स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसतोय. सोशल मीडियावर डीपीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेक रील व्हिडीओ बनवून तो त्याच्या चाहत्यांबरोबर नेहमी शेअर करताना दिसतो. विशेषतः महिलावर्ग हा त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आई व बायकोबरोबरचे व्हिडीओ बनवून तो शेअर करत असतो. असा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सध्या घरातही तुफान राडे करताना दिसतोय. एखादा हटके विनोदी डायलॉग मारत तो सदस्यांना हसवताना दिसतोय.
नॉमिनेशन प्रक्रियेतूनही धनंजय पवार अगदीच सुखरुप सेफ झालेला पाहायला मिळाला. कारण धनंजयचा बाहेर खूप मोठा चाहता वर्ग आहे. धनंजय हा मूळचा कोल्हापूरचा असल्याने संबंध कोल्हापूरकर त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच धनंजयची आई व पत्नी यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओद्वारे धनंजयच्या आईने व पत्नीने धनंजय हा ‘बिग बॉस मराठी’च्या एपिसोडमध्ये कुठेच दिसत नसल्याचे सांगितलं आहे. त्याला फार कमी फुटेज मिळत असल्याचं म्हणत त्यांनी ‘बिग बॉस’वर आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय. अनसीन अनदेखा या ‘बिग बॉस’च्या सेगमेंटमध्ये धनंजयचे अनेक फुटेज पाहायला मिळतात. मात्र यापैकी कोणतेच फुटेज किंवा हवा तेवढा फुटेज त्याला रोजच्या प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमात नाही दिला जात यावर दोघींनी भाष्य केलं आहे.
एक व्हिडीओ शेअर करत यांत धनंजयची आई सून कल्याणीला विचारते, “काय गं कल्याणी, काल जान्हवी धनंजयला सेफ करताना काय म्हणाली?”. त्यावर डीपीची पत्नी म्हणते, “जान्हवी म्हणाली, यांचा खेळ आहे. दिवसभर आमची चर्चा झाली. सकाळपासून खेळाबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. पण ती चर्चा कुठेच दाखवली नाही मम्मी? तसंच अंकिता ताईंनी त्यांना नॉमिनेट केलं हे पटलं नाही. तुम्हाला पटलं?”. यावर डीपीची आई म्हणाली, “मला तर अजिबात पटलं नाही. वैभवमुळे तिने आपल्या धनंजयला नॉमिनेट केलं”. पुढे कल्याणी म्हणाली, “त्या त्यांचा खेळ सुधारावा असं म्हणत आहेत, पण हे कारण पटलेलं नाही”.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : प्रीतम-प्रियाचं प्रेम आदित्यला अमान्य, पारू समजूत काढू शकेल का?, पाहणं ठरणार रंजक
पुढे डीपीची आई म्हणाली की, “मला तर अजिबात पटलं नाही. याबद्दल जनतेला काय वाटतं? हे त्यांनी सांगावं, असं माझं म्हणण आहे. ज्यावेळेला आमचा धनंजय खेळ कसा खेळायचा सांगतोय, समजवतोय, तेव्हा त्याला कॅमेरात दाखवतंच नाही, काय भानगड आहे?”. डीपीच्या पत्नीने पुढे सांगितलं, ‘”अनसीन अनदेखा’मध्ये दाखवतायत. पण संपूर्ण भागात का दाखवत नाहीत? एक चांगला एंटरटेनर म्हणून ते पुढे गेले आहेत. त्यांचं फुल्ल एंटरटेनमेंट आहे. जे तुम्ही ‘अनसीन अनदेखा’मध्ये दाखवत आहात. पण या एका तासाच्या भागात ते का दाखवत नाहीत?”. यावर डीपीची आई म्हणाली की, “धनंजय जे काही बोलतोय ते ‘बिग बॉस’ने दाखवायला पाहिजे, असं आमचं म्हणण आहे. हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत”.