टीव्हीवरील गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जीने काही दिवसांपूर्वीच गरोदर असल्याची घोषणा केली. बरेच दिवसांपासून देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा येत होत्या मात्र अभिनेत्रीने या चर्चांवर मौन बाळगलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने अखेर डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करत गरोदर असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली. ही गुडन्यूज दिल्यानंतर आता अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहते तिला खूप आशीर्वाद देत आहेत आणि कमेंट करुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Devoleena Bhattacharjee Flaunts Baby Bump)
देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये वाढदिवसाचे डेकोरेशन दिसत आहे, त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी हा सुंदर असा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये देवोलिना गोल्डन कलरच्या हॉल्टर नेक आउटफिटमध्ये दिसत आहे. हातात घड्याळ आणि मोकळ्या केसांसह अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
देवोलिना भट्टाचार्जीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वारंवार बेबी बंपला स्पर्श करताना दिसत आहेत. या व्हिडीओला तिने ‘अधुरी थी जरा सी मैं हो रही हूं….’ हे गाणं लावलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, देवोलीनाने अदृश्य इमोजी आणि काही हॅशटॅग देखील जोडले आहेत. देवोलीनाच्या या पोस्टवर चाहतेही भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत, “सर्वात सुंदर व्हिडीओ”, असं म्हणत कौतुक केलं आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “बहिणी काळजी घे”. दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “स्त्रीसाठी सर्वोत्तम भावना”. याशिवाय एकजण, “किती क्यूट” असं म्हणाला आहे.
देवोलिना भट्टाचार्जीने १५ ऑगस्ट रोजी एका पोस्टमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती.अभिनेत्रीने पती शानवाजबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना ही खुशखबर दिली. देवोलीना भट्टाचार्जी लग्नाच्या दीड वर्षानंतर आणि वयाच्या ३८ व्या वर्षी आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.देवोलीना भट्टाचार्जीने जिम ट्रेनर शानवाज शेखला काही वर्षे डेट केलं होतं, त्यानंतर हे दोघेही १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांनी नोंदणी पद्धतीने अगदी साधेपणाने त्यांचं लग्न केलं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. आता लग्नानंतर दीड वर्षांनी देवोलीना व शानवाज आई-बाबा होणार आहेत.