गायक, रॅपर हनी सिंग सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. हनी सिंग त्यांच्या पत्नीबरोबरच्या घटस्फोटामुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी दिल्ली न्यायालयाने गायक, रॅपर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्या लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर घटस्फोट मंजूर केला. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, परमजीत सिंग, प्रधान न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या दुसऱ्या प्रस्तावाला परवानगी दिली. यामुळे सुमारे अडीच वर्षांच्या या खटल्याला पूर्णविराम मिळाला आहे. (Honey Singh Divorce)
हिंदू विवाह कायद्यानुसार, घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून सहा ते अठरा महिन्यांच्या कालावधीनंतर दुसरा प्रस्ताव मांडला जातो. दरम्यान हनीचे वकील ईशान मुखर्जी यांनी याबाबत हवाला देत म्हटलं की, “दुसरा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे आणि घटस्फोटाचा आदेश जारी करण्यात आला आहे.” खाजगी वैवाहिक प्रकरणांतर्गत हे येत असल्याने ईशानने अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
जानेवारी 2011 मध्ये हनीने शालिनी तलवारसह लग्न केले आणि लग्नाच्या ११ वर्षानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ब अंतर्गत कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने याचिका स्वीकारत त्यांना सहा महिन्यांचा कालावधी दिला. हनी सिंगची पत्नी शालिनीने तक्रार करत म्हटलं होतं की, “हनीने मला मारहाण केली आहे. तसंच माझ्या कुटुंबावर त्याने मानसिक व भावनिक आघात केले आहेत. तसेच माझ्या कुटुंबाकडून पैसेही उकळले आहेत.” गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हनी सिंगने त्याची पत्नी शालिनी तलवारला १ कोटींचा डिमांड ड्राफ्टही सोपवला होता.
ऑगस्ट २०२१ मध्ये, शालिनीने दिल्ली येथील हजारी न्यायालयात धाव घेतली आणि हनी सिंगविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी हनी सिंगने सोशल मीडियावरून त्यावर लादलेल्या आरोपाबाबत भाष्य केलं. हे आरोप ‘अभद्र’,’खोटे’ व ‘दुर्भावनापूर्ण’ असल्याचं त्यांनी म्हटलं. २०११ मध्ये हनी सिंग आणि शालिनी तलवार या दोघांनी दिल्लीच्या एका गुरुद्वारामध्ये शीख रिती रिवाजांनुसार लग्न केलं. दोघांनी कुटुंबांच्या उपस्थितीत हे लग्न गुपचूप पार पाडलं.