पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत गेला. अजूनही युद्धबंदीनंतर पाकिस्तानद्वारे हल्ल्याची मालिका सुरुच राहिली. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही चोख उत्तर देण्यास सुरुवात केली. सीमेलगतही आता तणावाचं वातावरण आहे. अशातच एका कमांडो ऑफिसरने सोशल मीडियाद्वारे शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. कमांडो प्रिन्स जामवाल यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओद्वारे त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. बॉलिवूड सेलिब्रिटी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत शांत का? असा प्रश्न प्रिन्स यांनी सगळ्यांसमोर मांडला. (operation sindoor update)
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत बॉलिवूड सेलिब्रिटी गप्प का?, त्यांनी आपलं मत का नाही मांडलं?, नक्की कशाला हे लोक घाबरतात? असे अनेक प्रश्न प्रिन्स यांनी विचारले. ते म्हणाले, “बॉलिवूडची जेवढीही मोठी नावं आहेत, जेवढे मोठे कलाकार आहेत त्यांना माझा एकच प्रश्न आहे. गुटखा, पान-मसाला, पोकर, तीन पत्ती, बेटिंग एप्स यांना तुम्ही प्रमोट करता. मग ऑपरेशन सिंदूरबाबत तुम्ही एक ट्वीट किंवा एक पोस्ट करुच शकला असता. तुम्हाला अशी काय भीती होती?, फॅन फॉलोविंग तुमची कमी होईल?, ब्रँड डिल्स तुमच्या हातून जातील याची तुम्हाला भीती होती का?”.
पाहा व्हिडीओ
“मातृभूमीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यावरती काहीच नाही. हे लक्षात ठेवा. संपूर्ण जगामध्ये एखादी घटना घडली की, त्याच्याबाबत चर्चा होते. घडलेल्या घटनेच्या शहरातील किंवा देशातील प्रतिष्ठीत व प्रसिद्ध लोकांचे काय विचार आहेत? याला महत्त्व असतं. आता असं चित्र झालं आहे की, भारताने पाकिस्तानवर पहिला हल्ला केला आहे. पहलगाम हल्ल्याबाबत तर कोणी बोलतच नाही. पाकिस्तानी हे सगळं पसरवलं आहे. पाकिस्तानी सेलिब्रिटी, तेथील प्रतिष्ठीत व्यक्ती त्यांच्या देशाला उघडपणे पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानी जे त्यांच्या देशाबाहेर राहतात तेही पाठिंबा देताहेत. पण तुम्ही लोक गप्प आहात”.
आणखी वाचा – उत्तरप्रदेशमधील पालकांचा अभिमानास्पद निर्णय, १७ नवजात मुलींची नावं ठेवली ‘सिंदूर’ कारण…
“तुम्हाला जगभरातील कोट्यवधी लोक फॉलो करतात. तुम्ही मोठ मोठ्या लोकांबरोबर उठता-बसता. तुम्हाला मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना, फिल्म फेस्टिव्हलला बोलावलं जातं. मग तुमचे एक ट्वीट किंवा एक पोस्ट भारतासाठी किती महत्त्वाची ठरली असती याचा विचार करा. अजूनही तुम्ही याबाबत बोलू शकता. तुमची एक पोस्टही खूप महत्त्वाची ठरु शकते. संपूर्ण जगाला पाकिस्तानचं सत्य सांगा. जगाला सांगा नक्की काय झालं होतं?. जय हिंद”. या व्हिडीओला अनेकांनी सहमती दर्शवली आहे. तसेच बॉलिवूड बॉयकॉट, दाऊदला घाबरतात अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.