“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे ब्रीद असण्याऱ्या स्वामी समर्थांची प्रचिती देणारी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली किंवा वाचली असतील. स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवतात अशी एक श्रद्धा भाविकांची असते. याबद्दल अनेक भाविकांनी सांगितलेही आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही स्वामी भक्त आहेत आणि या कलाकारांना स्वामींनी प्रचिती दिली आहे. या कलाकारांनी त्यांचे-त्यांचे अनुभव हे अनेकदा शेअरही केले आहेत. अशातच आणखी एका विनोदी कलाकाराने त्याच्या स्वामी भक्तीतून आल्याच्या प्रचितीबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे आणि हा अभिनेता म्हणजे आशिष पवार.
‘कॉमेडी एक्सप्रेस’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आशिष पवार हा त्याच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेला हा अभिनेता स्वामी-भक्तही आहे आणि त्याला स्वामींची प्रचितीदेखील आली होती. याबद्दल त्याने ‘इट्स मज्जाच्या ‘मज्जाचा अड्डा’ या खास कार्यक्रमात सांगितले आहे. यावेळी त्याने माझ्या आयुष्यात स्वामींचे महत्त्वाचे स्थान असून माझ्या एका मैत्रिणीमुळे माझी त्यांच्यावरचे श्रद्धा वाढली असंही त्याने म्हटलं आहे.
याच स्वामी प्रचितीबद्दल बोलताना आशिषने असं म्हटलं की, “आमच्या घरात दत्तगुरुंचा एक फोटो आहे. माझे बाबा त्यांचे खूप मोठे भक्त आहेत. तेव्हा दत्तगुरुंच्या फोटोखालील एक व्यक्ती असायची ती व्यक्ती कोण आहे हे मला माहीत होतं. नंतर मला हळहळू कळत गेलं की, ते स्वामी समर्थ आहेत. तर स्वामींची भक्ती करायची सवय मला माझ्या एका मैत्रिणीमुळे लागली. तर तिने मला दर गुरुवारी मठात जायला सांगितलं, त्यांचं नामस्मरण कर असं सांगितलं आणि मी ते करायला लागल्यानंतर मला काही अनुभव यायले लागले. मी जे जे काही मागितलं ते ते माझ्याकडे आलेलं आहे”.
यापुढे त्याने एक किस्सा सांगतांना असं म्हटलं की, “मी दरवर्षी जानेवारीमध्ये अक्कलकोटला जातोच जातो. जानेवारी महिन्यात मला जमलं नाही तर वर्षभरात कधीना कधी जातोच, अनेक दिवस झाले आणि मला जायला जमलं नाही. यादरम्यान, मीही अनेकदा कंटाळा केला. एकेदिवशी मी गाडीत बसलेलो असताना गाडीतील स्वामींच्या मूर्तीकडे विनंती केली की, मला माहीत आहे, मी कंटाळा करत आहे. पण मला यायचं आहे आणि मी येणार. इतक्यात मला माझ्या पप्पांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या मित्राकडे स्वामींच्या पादुका आल्या आहेत. त्यामुळे आशिषला दर्शन घेऊन जायला सांगा. असं म्हटलं. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अक्षरश: पाणीच आलं”.