कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका व नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ अशा नवीन मालिका व नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले असून याद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. आता नव्या मालिका सुरु झाल्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या नवीन मालिकेमुळे ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच या वाहिनीवरील आता आणखी एक मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटलं जात आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं म्हटलं जात आहे. ‘रमा राघव’ या मालिकेतील रमा म्हणजेच मुख्य अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर कामानिमित्तची काही माहितीदेखील ती शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिने या मालिकेच्या निरोपाबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : अनंत अंबानीने रामदेव बाबांनाही नाचवलं, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
ऐश्वर्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्याबरोबर राघव म्हणजेच तिचा सहकलाकार, अभिनेता निखिल दामलेदेखील आहे. हा खास व्हिडीओ शेअर करत तिने “शेवटचे काही दिवस” असं म्हटलं आहे. वाहिनी किंवा मालिकेच्या निर्मात्यांकडून याबद्दल अद्याप अधिकृत कोणती घोषणा करण्यात आली नसली तरी अभिनेत्रीच्या या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मालिका संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस हा सर्वांचा आवडता शोदेखील येणार आहे. येत्या २८ जुलै रोजी ग्रँड प्रीमियर होणार असून त्यानंतर रोज हा शो रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाच्या पर्वाचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असल्यामुळे अनेक जण त्यांच्या होस्टिंगसाठीचीही वाट पाहत आहेत.