Chitra Wagh On Urfi Javed : मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी तिच्या याच फॅशनमुळे बरेचदा चर्चेत आली आहे. बरेचदा तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. यावरुनच काही दिवसांपूर्वी उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला. “असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी थेट उर्फीला दिला. आणि यावरुन उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. चित्रा वाघ या उर्फी जावेद प्रकरणाबाबत का बोलल्या?, त्यांच्याजवळ हे प्रकरण नेमकं कोठून आलं याबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
प्रख्यात अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले रानडे यांच्यासह ‘आरपार ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रा वाघ बोलत होत्या. मुलाखतीच्या प्रोमोत त्यांनी हा किस्सा सांगितल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “मध्यंतरी एक बाई मला सतत मॅसेज करायची. मला बोलायचंय, मला भेटायचंय असं ती सारखी म्हणायची, मग मला ही बाई नेमकी कोण आहे हा प्रश्न पडला. तेव्हा मी तिला मॅसेज करुन काय बोलायचं आहे ते बोलण्यास सांगितलं पण तिला माझ्याशी कॉलवरचं बोलायचं होतं. एकेदिवशी दौऱ्यावरुन मी रात्री उशिराने घरी आले, अडीच पावणेतीन वाजताची ती वेळ असावी. आणि घरी येऊन व्हॉट्सअपवर कामासंदर्भात काहीतरी पाहत असताना त्या बाईचा मला पुन्हा कॉल आला. त्यावर मी तिला मॅसेज करुन काय म्हणणं आहे ते सांगायला सांगितलं. बोलायचंच आहे असं ती म्हणाली, म्हणून मी न राहवून तिला कॉल केला आणि त्यांचा नेमका प्रश्न काय आहे, त्यांना काय त्रास आहे याबाबत विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला मॅसेजमध्ये एक व्हिडीओ पाठवला आहे तो पहा. यावर मी फोन ठेवून व्हॉट्सअपवर गेले तर त्यांनी मला एक व्हिडीओ पाठवला होता ज्यात एक मुलगी अर्धनग्न वेशात रस्त्यावरुन फिरत होती आणि तिच्यापाठी पाच-सहा मुलं चेकाळत होती. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला मला काहीच कळलं नाही, ती कोण आहे, अशी का फिरतेय हे काहीच कळलं नाही”.
आणखी वाचा – सलमान खानचा ‘सिकंदर’ सुपर फ्लॉप की हीट?, नक्की कसा आहे चित्रपट?, पहिला Review समोर
पुढे त्या किस्सा सांगत म्हणाल्या, “यावर मी त्यांना कॉल केला आणि विचारलं तुम्ही मला हे का पाठवताय. तुम्हाला काही मदत हवी आहे का?, यावर तिने मला आणखी एक व्हिडीओ पाठवला आणि मला पाहायला सांगितला. तो फोन ठेवून मी पुन्हा व्हॉट्सअपवर जाऊन व्हिडीओ पाहू लागले. मी रात्री उशिरा घरी आले म्हणून माझा मुलगा मला भेटायला आला तेव्हा त्याने माझ्या फोनवरचा व्हिडीओ पाहिला आणि म्हटलं की, ‘आई तू हे घाणेरडं काय पाहतेय? ही खूप घाण बाई आहे’. यावर मी त्याला विचारलं, ‘ही कोण आहे?’. तेव्हा त्याने मला सांगितलं, ‘ही उर्फी जावेद नावाची कोणतरी मॉडेल आहे’. मी ते सर्व व्हिडीओ पाहून पुन्हा त्या बाईला फोन केला आणि विचारलं, हे काय आहे ते मला कळलं, मी त्याची थोडक्यात माहिती घेतली यांत तुमचा प्रश्न नेमका काय आहे?, बाकी त्या मुलीबाबतची माहिती मी उद्या घेते. यावर ती बाई म्हणाली, ‘तुम्हाला चित्रा ताई मी उद्या फोन करते'”.
आणखी वाचा – आवाज गेला, श्वासही घेता येईना अन्…; कमी वयातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह भयंकर घटना, आता परिस्थिती कशी?
पुढे त्या म्हणाल्या, “सकाळी फोनवर बोलणं झाल्यावर त्या बाईने मला सांगितलं, ‘हे मी तुम्हाला यासाठी पाठवलं, आम्हाला तुमच्याकडून शासकीय मदत नको आहे. आम्ही अत्यंत चांगल्या कुटुंबातील मुलं आहोत, सदन कुटुंबातील मुलं आहोत. पण माझ्या नऊ वर्षाच्या मुलीवर रेप झाला आहे. आम्ही त्या ट्रामामधून अजून बाहेर आलो नाही आहोत. आम्हाला तुमच्याकडून कसलीच मदत नको आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगते की तुम्ही हे थांबवा. कारण या उघड्या, नागड्या बायका या मुंबईच्या रस्त्यावर फिरत आहेत. आणि मुलांना त्या चेकाळवत आहेत. हिला सांभाळायला चार बाउन्सर आहेत. यांत माझ्या मुलीचा काय दोष होता. हे जे काय भर रस्त्यात चाललंय त्यावर तुम्ही काही बोलणार आहेत की नाही?, की तुम्ही फक्त हाय प्रोफाइल केसवर बोलणार आहात?, आम्ही अजून त्या ट्रॉमातून बाहेर नाही आलोय. माझ्या मुलीचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. मी आई म्हणून, तिचे बाबा बाबा म्हणून यांतून बाहेरच आले नाही आहोत. आणि हा नंगा नाच तुम्ही कधी थांबवणार?’, हे असे तिचे शब्द होते. आणि त्यानंतर मी उर्फी जावेदचा विषय काढला. आणि त्यावर नेहमीप्रमाणे टिकेची झोड आली. यांना प्रसिद्धी हवी असं बोललं गेलं कसली प्रसिद्धी?, यावर महिलाच म्हणाल्या संविधानाने दाखला दिला कोणी काय घालायचं ?, आणि यासाठी प्रचंड टीका सहन केली”.