वर्षभरातील शेवटचा सण आता अगदीच जवळ आला आहे. हा सण युरोपीय देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याबरोबरच भारतातदेखील या सणाचा उत्साह बघायला मिळतो. मस्त सजवलेलं ख्रिसमस ट्री असो किंवा घराला केलेली सजावट असो यामुळे सर्वत्र आनंददायी वातावरण असलेले बघायला मिळते. मात्र यासगळ्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मिठाई. नाताळ हा सण असल्याचे मिठाई विसरून चालणार नाही. मग यासाठी कोणती मिठाई अधिक प्रसिद्ध असते? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. जसे दिवाळीला गोड म्हणून प्रसिद्ध आहे तसेच नाताळला केक खूप प्रसिद्ध आहे. मात्र हे काही विशिष्ट केक आपल्याला घरी बनवता येतीलच असे नाही. (plum cake for christmas)
आता नाताळ म्हंटलं की येशूच्या जन्माचा दिवस. या दिवशी पाश्चिमात्य देशातील लोक हा दिवस खूप आनंदाने साजरा करतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मिठाईदेखील बनवली जाते. पण प्रामुख्याने प्लम केक विशेषतः कॅथलिक लोकांच्या घरी बनवला जातो. हा केक रम हे मद्य वापरुनही बनवला जातो. आता हे केक मुंबईमध्ये कुठे मिळतील याबद्दल आपण आता जाणून घेऊया. मुंबईतील दक्षिण मुंबई म्हणजे साऊथ बॉम्बेमधील माहीम, वांद्रे या भागात कॅथलिक लोकांची संख्या अधिक आहे. तर वांद्रे या भागात असे केक, तसेच नाताळ स्पेशन मिठाई कुठे मिळेल? हे आपण आता जाणून घेऊया.
वांद्रे पश्चिम येथील ए-वन या बेकरीमध्ये तुम्हाला चविष्ट असा रम असलेला व रम नसलेला असे दोन्ही प्रकारचे प्लम केक खायला मिळतील. या अर्धा किलो केकची किंमत ५०० रुपये असून चवीसाठी छोटा केकदेखील मिळेल. तसेच इतर मिठाईदेखील २५० रुपयांपासून मिळू शकेल. तसेच तेथीलच व्हिनस या बेकरीमध्येदेखील उत्कृष्ट दर्जाचे प्लम केक व इतर मिठाई मिळू शकेल.
त्याचप्रमाणे माहिम येथेही अनेक अशी ठिकाणं आहेत ज्यामध्ये तुम्हाला चविष्ट असे पदार्थ मिळणार आहेत. माहीम येथील डोरोथी या बेकरीमध्ये खूप छान असे प्लम केक मिळतील. २८० रुपयांमध्ये साधारणपणे ४०० ग्राम प्लम केक मिळू शकतील. तसेच या ठिकाणी चिकन चिली क्रॉसॉ, हॉट डॉगदेखील मिळतील. जर तुम्हालादेखील असे चविष्ट केक खायला हवे असतील तर वांद्रे व माहीम येथील बेकरीना भेट द्या आणि नाताळ साजरी करा.