Santosh Juvekar On friendship : गेले काही दिवस चित्रपटसृष्टीमध्ये एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती आणि तो चित्रपट म्हणजे ‘छावा’. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस तो चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने एका दिवसातच कोट्यवधी रुपयांची कमाई केली. ‘छावा’ रेकॉर्डब्रेक कमाई करणार असे अंदाज वर्तवले जात आहे. शिवाय विकीने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत सिनेरसिकांना थक्क केलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी इतिहास रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा जिवंत केला. ‘छावा’ची चर्चा सुरु असताना एका मराठी अभिनेत्याचंही प्रेक्षक तोंडभरुन कौतुक करत आहेत. तो अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर.
संतोषने ‘छावा’मध्ये रायाजी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेला त्याने अगदी योग्य पद्धतीने न्याय दिला. याचवेळी संतोषला ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात बोलवण्यात आलं. यावेळी त्याने ‘छावा’सह अनेक विषयांवर धमाल गप्पा मारल्या. ‘छावा’ची तयारी, विकी कौशलबरोबरची मैत्री ते इंडस्ट्रीतील सत्य परिस्थिती याबाबत तो दिलखुलसपणे बोलला. याचवेळी संतोषला त्याच्या मित्र परिवाराविषयी विचारण्यात आलं.
आणखी वाचा – ‘छावा’साठी प्रेक्षक वेडे, एका दिवसातच कमावले तब्बल इतके कोटी, विकी कौशलचा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करणार
‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात संतोषला इंडस्ट्रीतील मित्र-मंडळी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण यांच्याबरोबर मैत्री याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संतोष म्हणाला, “भरपूर मित्र आहेत आणि मी मित्रांमध्ये असतो. पण आजकाल मित्रांमध्ये राहणं मी कमी केलं आहे. कुशल वगैरे आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण मला नेहमी वाटतं की, इंडस्ट्रीमध्ये कोणीही कोणाचा मित्र नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके मित्र आहेत. जर तुमची वेळ चांगली असेल तर सगळे तुमच्याबरोबर असतील. पण जर तुमची वेळच चांगली नसेल तर कोणीच तुमच्याबरोबर नसेल. त्यामुळे वेळच तुमचा सख्खा मित्र आहे. समोरचा माझा अगदी जवळचा मित्र आहे हे आपण समजत असतो. पण कालांतराने कळतं की हे फक्त आपणच समजत आहोत. अशावेळी समोरच्याकडे अनेक पर्याय असतात. तेव्हा मग कळतं की आपण कुठेतरी चुकत आहोत”.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादिया कोणाच्याच संपर्कातच नाही, फोन बंदही अन्…; प्रकरण तापलं असताना गायब असल्याची चर्चा
पुढे तो म्हणाला, “काहीतरी गडबड आहे. आता थांबण्याची हिच वेळ आहे हे कळतं. म्हणूनच मी आता हळूहळू थांबत चाललो आहे. माझं काम, वेळ हेच माझे आता चांगले मित्र आहेत. मित्र आहेत नाही असं नाही पण फार कमी आहेत. भेटल्यावर मी गप्पा मारतो, धमाल, मस्ती असते. पण ज्याच्यावर हक्क दाखवू शकतो असा मित्र नाही. उशीरानेही काही गोष्टी कळतात हेही चांगलं आहे. तसंही प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य आहे. फक्त आपणच एखाद्यावर हक्क दाखवत राहायचं आणि समोरच्याला तो हक्क नको आहे तर मग लांबच राहायचं”. संतोषने गेल्या काही वर्षांत स्वतःमध्ये अगदी सकारात्मक बदल घडवले आहेत.