Sharayu Sonawane Wedding Scene : पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचे नेहमीच चांगल्या अर्थाने दोन चेहरे असतात असं म्हटलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे कॅमेऱ्यासमोर असताना त्यांना त्यांचं खासगी आयुष्य विसरुन प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून काम करावं लागतं. झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेतील शरयूही अगदी असंच कौतुकास्पद काम करते. तिच्या कामामुळेच ती आज घराघरांत पोहोचली आहे. शरयूने खासगी आयुष्यातही अनेक प्रसंगांना हिंमतीने तोंड दिलं. इतकंच काय तर तिच्या लग्नातच एक भयंकर घटना घडली. शरयूचा चेहराच पूर्ण जळाला होता. ही घटना नेमकी काय होती याचबाबत तिने व तिचा पती जयंत लाडेने मुलाखतीत सांगितलं आहे.
‘पारू’ फेम शरयू व तिचा पती जयंत लाडेने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘इट्समज्जा’ बरोबर संवाद साधला. यावेळी दोघांनीही त्यांची लव्हस्टोरी सांगितली. तसेच लग्नातील धमाल किस्सेही दिलखुलासपणे सगळ्यांसमोर उघड केले. यावेळी शरयूला लग्नादरम्यान एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला. याचबाबत पती जयंत यांनी सांगितलं. ते म्हणाले, “शूटमधून तिला सुट्टी मिळाली आणि परवा लग्न असं सगळं होतं. सगळं प्लॅनिंग करायला हिच्याकडे फक्त एक दिवसच होता. रात्री शूट संपवून उशीरा घरी आली. त्यामुळे शरयू दुसऱ्या दिवशी दिवसा सलॉनमध्ये गेली. तिथे तिने चेहऱ्याचं वॅक्स केलं. वॅक्स करताना त्यांनी काहीतरी चुकीचं केमिकल वापरलं. त्यामुळे शरयूचा संपूर्ण चेहराच जळला होता. चेहऱ्यावर डाग झाले”. याच प्रसंगाबाबत शरयू म्हणाली, “लग्न, सगळ्या विधी मस्त एन्जॉय करायच्या हे माझं ठरलं होतं. आणि तसंच मला करायचं होतं. मला खूप छान दिसायचं आहे हिच माझी इच्छा होती”.
जयंत पुढे म्हणाले, “दुसऱ्यादिवशी लगेच मुळशीसाठी आम्हाला निघायचं होतं. तिथेच एका रिसॉर्टमध्ये आमचं लग्न झालं. ज्या दिवशी सलॉनमधून ही घरी आली त्यादिवशी मेहंदी होती. दुसऱ्या दिवशी लग्नासाठी जाणार तर हिची रडारड सुरु झाली. फोटो बघितल्यानंतर मलाही धक्का बसला”. यादरम्यान दोन्ही कुटुंबियांनाही रडू आवरत नव्हतं. “माझ्या घरी मी रडले की, माझी आई, मावशी, ताई असे सगळे रडायचे. मला बघून सगळे रडत होते. माझ्या सासूबाईंनाही कळत होतं की शरयू रडतेय. मी रडत आहे हे पाहून जयंतच्या घरातीलही सगळे रडायचे”. पण या कठीण प्रसंगात शरयूच्या नवऱ्याने एक निर्णय घेतला. याचबाबत जयंत म्हणाला, “काही विघ्न आलं का? असं घरातील मंडळींनाही वाटू लागलं. मग मी निर्णय घेतला की, जे असेल ते आपण करु. माझ्या ओळखीतील चांगल्या मेकअप आर्टिस्टला मी बोलावलं. तिच्या चेहऱ्यावर जेवढे डाग झाले होते ते मेकअप आर्टिस्टने सगळं नीट केलं. मेकअप नंतरही तिच्या चेहऱ्यावरचे डाग दिसतच होते. शरयूला तोंडही उघडता येत नव्हतं. पण शरयूला एक हिंमत दिली. सगळं चांगलं होणार म्हणून समजवलं. लग्नासाठी पोहोचलो तिथे आमच्या दोन्ही कुटुंबाचं जल्लोषात स्वागत झालं”.
आणखी वाचा – ‘छावा’साठी प्रेक्षक वेडे, एका दिवसातच कमावले तब्बल इतके कोटी, विकी कौशलचा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करणार
जयंत पुढे म्हणाला, “साखरपुड्यासाठी शरयू उभी राहिली आणि जोरजोरात रडायला लागली. मी पहिल्यांदाच लग्न करतेय असं कसं करणार. चेहरा खराब होता. आपण लग्न पुढे ढकलू असं सगळं तिचं सुरु होतं. तेव्हाही तिला कसंतरी समजावलं. काही लोक लग्नाला आले होते त्यांनाही हिचा चेहरा बघून धक्का बसला होता. कारण डाग तेवढे दिसत नसले तरी मेकअप एवढा का केला? हा त्यांना प्रश्न होता. आम्ही हे सगळं कोणालाच कळू दिलं नाही. आजपर्यंत कोणालाच हे सगळं माहित नाही. फक्त या मुलाखतीत आज आम्ही पहिल्यांदा सांगितलं आहे”. शरयू व जयंत यांच्यामधील नातं पहिल्यांदाच खुलेपणाने प्रेक्षकांसमोर आलं आणि दोघांमधील नात्याचा गोडवाही सगळ्यांना अनुभवायला मिळाला.