महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. झी मराठीवरील या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यातील सगळी कलाकार मंडळीही प्रेक्षकांची बरीच लाडकी आहेत. सर्व कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. स्नेहलने या रिऍलिटी शोमधून तिच्या अभिनयशैलीने व विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. (Snehal Shidam New Movie)
स्नेहलच्या कॉमेडीचा अनेक चाहते आहेत. नेहमीच ती प्रेक्षकांना खळखळवून हसवण्यात तत्पर असते. स्नेहलने आजपर्यंत कार्यक्रमात सगळ्या विनोदी भूमिका अगदी सहजपणे साकारल्यात. पण जेवढ्या सहजतेने तिने या भूमिका साकरल्या तितकं सहज तिचं आयुष्य नव्हतं. याबाबत तिने बऱ्याच मुलाखतीद्वारे सांगितलं आहे. सोशल मीडियावरही स्नेहल बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवरुन असं कळतंय की, स्नेहलने मराठी सिनेसृष्टीतून तिची पावले आता हिंदी सिनेसृष्टीकडे वळविली आहेत. स्नेहलने शाहिद कपूरबरोबर शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहिदबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याखाली कॅप्शन देत लिहिलं आहे की, “कळवायला उशीर व आनंद दोन्ही होत आहे. शाहीद कपूर व क्रिती सॅनन यांचा नवीन हिंदी सिनेमा ‘तेरी बातो में ऐसा उलझा जिया’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक छोटीशी भुमिका आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की सिनेमा बघा. आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असच राहुद्या” असं तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे.