सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आज इंटरनेट सगळ्यांकडे उपलब्ध आहे. अनेक गाणी अशी आहेत जी सोशल मीडियामुळेच अधिक लोकप्रिय होतात. याचबरोबर अनेक जुनी गाणी ही सोशल मीडियामुळेच पुन्हा एकदा समोर आली. अशातच आता एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानचं बदो बदी गाणं खूप चर्चेत आलं. हे गाणं समोर येताच मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं. पण आता या गायकाला मोठा धक्का बसला आहे. (Bado badi song delete)
चाहत फतेह अली खानचं नवीन गाणं बदो बदी हे गाणं युट्यूबवर आल्यानंतर या गाण्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले. पण हे गाणं आता युट्यूबवरुन हटवण्यात आलं आहे. या गाण्यावर कॉपी राइट आल्याने हे गाणं हटवण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल सांगायचे झाले तर हे गाणं मूळ सुप्रसिद्ध गायिका नूरजहा यांचे एक शास्त्रीय गाणं आहे. त्यानंतर आता हे गाणं चाहत यांनी गायलं. त्याच्या व्हिडीओने एका महिन्याच्या आत १२८ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉपी राईट्समुळे हे गाणं युट्यूबवरुन काढले. हे गाणं १९७३ साली आलेल्या ‘बनारसी ठग’ या चित्रपटातील नूरजहा यांच्या आवाजातील आहे. हे गाणं समोर आल्यानंतर भारत,पाकिस्तान बांग्लादेशसहित संपूर्ण दक्षिण आशियामध्ये व्हायरल झाले. दरम्यान चाहत यांचे हे गाणे सोशल मीडियावर येताच त्यावर अनेक मीम्सदेखील तयार झाले. चहात यांना २०२३ साली IPPA अवॉर्ड्समध्येही आमंत्रित केले होते.
चाहत फतेह अली खान हे नाव लॉकडाऊनच्या वेळी अधिक प्रकाशझोतात आलं. आजवर सोशल मीडियावरील त्यांच्या गाण्यांनी रेकॉर्ड केले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात मीम्सदेखील तयार केले. अशातच आता गाणं डिलिट झाल्यानंतरही नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणतो की, “बरं झालं गाणं डिलिट झालं ते, कंटाळा आला होता”, दूसरा नेटकरी लिहितो की, “बदो बदीने वेड लावलं होतं. चांगलं झालं डिलिट केलं ते”, अशा अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.