कधी कधी बॉलिवूडच्या झगमगाटामागे खूप गोष्टींचा अंधार पडलेला असतो. मात्र अनेकजण फक्त त्या झगमगाटाकडे लक्ष देतात अंधाराकडे नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी कथा असते. जर कोणी आनंदी दिसत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या मनात दुःख नाही. बॉलिवूडमधील अशाच एक लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या आहेत. त्यांनी ज्याच्यावर प्रेम केले ती व्यक्त त्यांना सापडली नाही आणि ज्याच्याशी त्यांनी लग्न केले त्या व्यक्तीनी त्यांची साथ सोडली. तरीही रेखाच्या चेहऱ्यावर कायम हास्यच दिसते. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक दु:खांचा भार आहे. या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा.
रेखा यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रेखा यांची लव्हलाईफ अनेकदा चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असताना अनेकदा अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे. नवीन निश्चल याच्यानंतर जितेंद्रने किरण कुमार आणि नंतर विनोद मेहरा यांच्याशीही त्यांचे नाव जोडले गेले होते. विनोद मेहराबरोबरच्या त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्याही आल्या होत्या. पण रेखा यांनी नेहमीच या सर्व गोष्टींचे खंडन केले. या कलाकारांबरोबरच अमिताभ बच्चन व रेखा यांच्या नात्याबद्दलच्यादेखील अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि त्या चर्चा आजही रंगताना दिसतात.

८०च्या दशकात अमिताभ व रेखा हे पहिल्यांदा ‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर दोघांनी जवळपास १० चित्रपट एकत्र केले. त्यांचा शेवटचा एकत्र चित्रपट ‘सिलसिला’ (१९८१) होता. ज्यानंतर दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. अमिताभ बच्चनपासून वेगळे झाल्यानंतर रेखाने १९९०मध्ये मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले पण काही महिन्यांनंतर त्यांनी आत्महत्याही केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रेखाने एकटे राहणे स्वीकारले आणि आजही तेच जीवन जगत आहे.
आणखी वाचा – नवऱ्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकरांनी अविनाश यांना केकही भरवला अन्…; फोटो व्हायरल
रेखा या अगदी खुल्या मनाची महिला आहेत आणि त्यांनी नेहमीच मोकळेपणाने बोलणे पसंत केले आहे. सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा स्वीकार केल्याचे म्हटलं होतं. ‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, जेव्हा सिमी गरेवाल यांनी रेखा यांना मद्यपानाच्या सवयीबद्दल विचारले. तेव्हा रेखा यांनी असं म्हटलं की, “अर्थात मी खूप दारु प्यायले आहे आणि मी खूप ड्रग्जदेखील घेतले आहे. पण मला कोणी विचारलं का की, मी असं का करते? आयुष्याकडून मला काय मिळालं आणि काय नाही?”
यापुढे “तुम्ही तुमचे हृदय एखाद्या विवाहित व्यक्तीला दिल्याबद्दल काय सांगाल?” असाही एक प्रश्न सिमी गरेवालने त्यांना विचारला. यावर रेखा यांनी उत्तर देत असं म्हटलं होतं की, “मी त्याच्यावर (अमिताभ बच्चन) मनापासून प्रेम करते. पण कोणाचे घर तोडून मी कधीच आनंदी होऊ शकत नाही. त्यामुळे मी कधीच माझा हक्क मागितला नाही आणि नेहमी त्याच्या सुखासाठी प्रार्थना करते”.