बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाच्या बाबतीत नीना गुप्ता यांचा हात कुणीही धरू शकत नाही. उत्तम अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. नीना गुप्ता या आपल्या स्पष्टवक्ते व बोल्ड स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहेत. देशातील विविध मुद्द्यांवर अभिनेत्री मनमोकळेपणाने बोलताना पाहायला मिळते. अनेकांना या अभिनेत्रीने मांडलेले मुद्दे पटतात तर काहींना हे मुद्दे न पटल्याने त्यांना ट्रोलिंगची शिकारही व्हावं लागतं. (Neena Gupta On Feminism)
अशातच नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. स्त्रीवादावर केलेल्या भाष्यामुळे त्या चर्चेत आल्या असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच रणवीर अलावादियासह झालेल्या संवादादरम्यान त्यांनी स्त्रीवादावर आपले मत व्यक्त केले. स्त्रीवाद हा मुद्दा मुळात फालतू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नीना गुप्ता म्हणतात की, ‘तुम्हाला निरुपयोगी स्त्रीवादावर विश्वास ठेवावा लागेल, हे आवश्यक नाही. मला असे म्हणायचे आहे की स्वतःला लहान समजण्यापेक्षा स्वतःची किंमत समजून घेणे कधीही चांगले असते. गृहिणी असाल तर स्वतःकडे तुच्छतेने पाहू नका. ही एक महत्त्वाची भूमिका आहे. असो, स्त्री व पुरुष एक होऊ शकत नाहीत. ज्या दिवशी एक पुरुष बाळाला जन्म देईल, त्या दिवसापासून दोघांना समान म्हणणं योग्य ठरेल”.
त्या पुढे असंही म्हणाल्या आहेत की, ‘महिलांना पुरुषांची जास्त गरज असते. मला आठवतंय की, मी तरुण व अविवाहित असताना मला ६ वाजताची फ्लाईट पकडायची होती. मी पहाटे ४ वाजता घरातून बाहेर पडले तेव्हा एक मुलगा माझ्या मागे लागला. त्यावेळी माझा कुणीही बॉयफ्रेंड वगैरे नव्हता. तेव्हा मी घाबरले आणि घरी परतले. मग मी दुसऱ्या दिवशी फ्लाइट बुक केली आणि माझ्या पुरुष मित्राच्या घरी येऊन मी थांबले जेणेकरून तो मला विमानतळावर सोडायला येईल. त्यावेळी मला एका पुरुषाची गरज भासली. अशा प्रकारे आपल्याला त्यांची अधिक गरज आहे” असं म्हणत पुरुषांचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं.