आज ८ मार्च रोजी देशभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सगळ्याच महिला हा दिवस खास असल्यासारखा साजरा करताना दिसतात. या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पण अभिनेत्रीच्या ही पोस्ट तिच्यावरच भारी पडली आहे. आलियाने शेअर केलेल्या या पोस्टने साऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. या पोस्टवरुन अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. (Alia Bhatt Troll)
आलियाने महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हृदयाच्या आकाराच्या सॉफ्ट टॉयचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने राहाने महिला दिनानिमित्त ही भेटवस्तू तिने तिच्यासाठी बनवली असल्याचं म्हटलं आहे. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या लहान लेकीने हे माझ्यासाठी बनवले आहे आणि मी ते तुमच्या सर्वांसह शेअर करत आहे. मी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. आज आणि दररोज स्वतःला वेळ देण्यासाठी एक मिनिट जरुर काढा”.
दरम्यान, आलियाची ही पोस्ट अजूनही चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा भडीमार केला आहे. आलियाच्या या पोस्टवर अनेक जण प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर अभिनेत्रीला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “राहाला शिवणकाम येतं का? २ वर्षांची मुलगी हे कसे बनवू शकते? कृपया कोणीतरी मला हे समजावून सांगू शकेल का”. तर दुसऱ्या एका युजरने सांगितले आहे की, “काहीही. एक सेलिब्रिटी म्हणून काहीही पोस्ट करा, सर्वकाही छानच आहे”.
नुकतीच आलिया तिची मुलगी राहा व पती रणबीर कपूरसह अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला गेली होती. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अनंत राहाबरोबर खेळताना दिसला. आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री लवकरच संजय लीला भन्साळीच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रणबीर कपूर व विकी कौशलही दिसणार आहेत.