बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या खूप चर्चेत आला आहे. आजवर वरुणने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकताच त्याचा ‘सिटाडेल हनी बनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूदेखील दिसून आली होती. या चित्रपटांमध्ये वरुणने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. मात्र व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही तो आता अधिक चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. वरुणला या वर्षी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. मुलीच्या जन्मानंतर आयुष्य पूर्णपणे बदलले असल्याचेही त्याने सांगितले आहे. तो नक्की काय म्हणाला? हे आपण जाणून घेऊया. (varun dhawan on daughter)
वरुण नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने मुलीबद्दल भाष्य केले आहे. वरुणने सांगितले की, “मला आधी एक महिला ओरडायची. पण आता मला दोन महिला ओरडतात. मुलीला कसा ढेकर कसा द्यायचा हे मी शिकतोय. मी तिला कसं घ्यावं हे पण शिकत आहे. ती रडायला लागली की मला भीती वाटते. कधी कधी रात्री मी थकलेला असतो आणि ती रडू लागते तेव्हा मी उठायचं नाटक करतो. पण नताशा माझ्या आधी उठते आणि तिला शांत करण्यासाठी जाते”.
याआधी एका मुलाखतीमध्ये वरुणने मुलीसाठी प्रोटेक्टिव्ह असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला की, “मला वाटत की जे कोणीही आई-वडील होतात त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव असतो. एखादी महिला आई होते तेव्हा ती वाघीण होते पण एक पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा तो प्रोटेक्टिव्ह होतो. मुलांसाठीपण असतात पण मुलींसाठी जास्तच असतात. माझ्या मुलीला जर कोणी हात लावला तर मी त्याला मारुन टाकेन”.
वरुण व नताशा हे दोघंही २४ जानेवारी २०२१ साली लग्नबंधनात अडकले. नंतर जून २०२४ मध्ये आई-वडील झाले. त्यांची मुलीचं नाव लारा असं ठेवलं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आई-वडील होणार असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. सध्या वरुणच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, आता तो ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसून येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा व जॅक श्रॉफ हे कलाकार दिसून येणार आहेत.