बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व ‘शक्तिमान’ मालिकेतील अभिनेते मुकेश खन्ना यांच्यामधील वाद विकोपाला गेलेले बघायला मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश यांनी सोनाक्षीच्या संस्कार व पालनपोषणावर भाष्य केले होते. याववरुन अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट लिहीत मुकेश यांना सुनावले होते. तिने लिहिले की, “प्रिय मुकेश सर, मी नुकतेच तुमचे एक वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये मी रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही म्हणून माझे वडील जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. त्यावेळी हॉट सीटवर दोन महिला बसल्या होत्या. दुसऱ्या महिलेलादेखील उत्तर येत नव्हतं. मात्र तुम्ही माझ्यावर निशाणा साधला. त्यावेळी मला सुचलं नाही म्हणून मी उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे कृपया माझ्या आई-वडिलांबद्दल तुम्ही काही बोलू नका”. (shatrughan sinha on mukesh khanna)
दरम्यान सोनाक्षीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर लगेचच मुकेश यांनी त्यावर प्रतिक्रिया देत म्हंटले की, “मला आश्चर्य वाटते की सोनाक्षीला प्रतिक्रिया देण्यासाठी इतका वेळ लागला. केबीसी शोमध्ये घडलेल्या त्या घटनेसाठी मी त्याचे नाव घेऊन नाराज होतो हे मला माहीत होते. पण तिची किंवा त्यांच्या वडिलांची, जे माझे ज्येष्ठ आहेत, त्यांची बदनामी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत”.
आता या प्रकरणात खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेत मुलीची बाजू घेऊन मुकेश यांना खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, “सोनाक्षीने रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिले नाही याबद्दल कोणाला का समस्या आहे? सर्वात आधी त्या व्यक्तीला रामायणाची पूर्ण जाण आहे का? त्यांना काय हक्क आहे? त्यांना हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणून कोणी निवडलं आहे का? सोनाक्षीला रामायणाबद्दल माहिती नाही म्हणून ती चांगली हिंदू ठरत नाही का?”.
तसेच ते म्हणाले की, “सोनाक्षीने तिच्या मेहनतीने या क्षेत्रात तिचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मी तिला काहीही मदत केली नाही. मला माझ्या तीनही मुलांचा अभिमान आहे. माझ्या मुलीला कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”, असेही ते म्हणाले. आता शत्रुघ्न यांच्या या वक्तव्यावर मुकेश काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.