महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर, लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘धर्मवीर २’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित होते. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात सलमान खान, जितेंद्र, गोविंदा यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाची शोभा वाढविली. या ट्रेलर अनावरण सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांना बॉलीवूड कलाकारांमधील एकी पाहायला मिळाली कारण त्यांनी यावेळी एकमेकांना मिठी मारली. इतकंच नव्हे तर मराठी कलाकारांसह त्यांची असलेली वागणूक पाहून त्यांचं कौतुकही केलं जात आहे. (Salman Khan At Dharmveer 2 Trailer launch)
‘धर्मवीर २’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम २० जुलै रोजी मुंबईत निर्मात्यांनी आयोजित केला होता. या बिग बजेट चित्रपटाच्या मोठ्या सोहळ्यामध्ये सलमान खानने शानदार एण्ट्री केली. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते गोविंदा, जितेंद्र आणि प्रेक्षकांची लाडके अशोक सराफ व इतरही कलाकार मंचावर उपस्थित होते. समोर आलेल्या कार्यक्रमाच्या क्लिपमध्ये ‘टायगर ३’ अभिनेता सर्व सेलिब्रिटींना भेटताना दिसत आहे. त्याने त्याच्या बॉलीवूड सीनियर गोविंदा आणि जितेंद्रलाही मिठी मारली. त्याच्याशी बोलल्यानंतर खान कार्यक्रमाच्या मध्यभागी पोहोचले.
कार्यक्रमात सलमान खानने स्टेजवर येऊन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी तो असे म्हणताना दिसत होता की, “मी पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आलो होतो आणि तो चित्रपट खूप हिट झाला आणि मी प्रार्थना करतो की हा चित्रपट आणखी हिट व्हावा. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र”. या सोहळ्यादरम्यान सलमान खानने केवळ बॉलिवूड कलाकारांनाच नाही तर मराठमोळे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचीही गळाभेट भेटली. सलमान खानच्या या कृतीने चाहत्यांमध्ये आनंद पसरला असून सगळेजण त्याच्या साधेपणाचं कौतुक करताना दिसत आहेत.
सलमान खानसाठी २०२३ हे वर्ष यशस्वी ठरले. ‘किसी का भाई किसी की जान’ या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’च्या सिक्वेलमधून पुनरागमन केले. ‘टायगर ३’ त्याच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला आणि २०२३च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक बनला. यावर्षी तो त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एआर मुरुगदोस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित हा चित्रपट २०२५च्या ईद वीकेंडला प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.