हिंदी टेलिव्हीजन शो ‘कौन बनेगा करोडपती’ सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. सध्या या कार्यक्रमाचे १६ वे पर्व सुरु आहे. यामध्ये आजवर अनेक स्पर्धकांसह अनेक कलाकारदेखील उपस्थित राहिले होते. दीपिका पदुकोण, जया बच्चन, अभिषेक बच्चन, आमीर खान, अगस्त्य नंदा, सोनाक्षी सिन्हा, जुनैद खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख असे अनेक कलाकार आजवर उपस्थित राहिले आहेत. प्रश्न-उत्तरे, धमाल-मस्ती देखील करण्यात आली आहे. तसेच काही जण चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील उपस्थित राहिले होते. अशातच आता बॉलिवूडमधील एक आघाडीचे कलाकार उपस्थित राहिलेले दिसून आले. या कलाकाराबरोबर धमाल मस्ती, गप्पादेखील मारण्यात आल्या. (nana patekar on kbc show)
अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘कौन बनेगा…’ या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. सध्या ते ‘वनवास’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. या कार्यक्रमामध्ये ते नेहमीप्रमाणे साध्या वेशामध्ये दिसून आले. यावेळी प्रश्नोत्तराबरोबरच त्यांनी खूप गप्पादेखील मारल्या. यावेळी अमिताभ यांनी नानांना गावाकडे राहण्याबद्दलचे काही प्रश्न विचारले. त्यावर नाना म्हणाले की, “मी खरं तर मनोरंजन क्षेत्रातून आलो नाही. मी गावाकडे राहणारा साधा माणूस आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी कामासाठी इथे येतो आणि काम करुन परत जातो. मी गावचा आहे आणि तिकडचाच राहीन. गावी छान वाटतं”. त्यानंतर अमिताभ विचारतात की, “तुम्ही गावाकडे कोणत्या नजरेने बघता?”, त्यावर नाना म्हणाले की, “शहरांमध्ये भिंती आहेत. गावांमध्ये आजूबाजूला डोंगर आहेत तिकडे कोणताही गजर नाही. पक्ष्यांच्या आवाजाने उठतो तर कधी कधी मोरदेखील येतात. तिकडचं आयुष्यं खूप साधं आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी सकाळी लवकर उठतो. माझ्या घरामध्येच व्यायाम करतो. मी माझ्या गाईची आणि बैलांची काळजी घेतो. मी स्वतःचं जेवण स्वतः बनवतो. मला कधी वाटलं की माझं चित्रपटातील करियर चांगलं चालत नाही तर मी गावीच एक छोटं हॉटेल सुरु करेन. पण मला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळालं”. तसेच या सगळ्या सांभाषणादरम्यान अमिताभ खूप प्रभावित झाले होते. नाना अमिताभ यांना उद्देशून म्हणाले की, “गावातील घर केवळ माझंच नाही तर तुमचंपण आहे. कधीही वाटलं तर तुम्ही येऊन राहू शकता”. दरम्यान नाना व अमिताभ यांच्या गप्पा खूपच रंगलेल्या दिसून आल्या.