प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार दिवस-रात्र मेहनत करत असतात. पण प्रत्येक कलाकाराला आपल्या कामाचा योग्य तो मोबदला मिळतो का? हा वर्षानुवर्षे न सुटणारा प्रश्न आहे. कित्येकदा तर मानधन मिळालं नाही, मानधन खूप कमी मिळालं अशा अनेक तक्रारी कलाकारांकडूनच कानावर येतात. अनुभवाने कमी असलेल्या कलाकारालाही बऱ्याचदा अवाढव्य मानधन मिळतं. त्या तुलनेत अनुभवी कलाकाराला हवे तितके पैसे मिळत नाही. असंच काहीसं आता सुप्रसिद्ध अभिनेत्री मुश्ताक खान यांच्याबाबत घडलं आहे. मुश्ताक यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तरीही मानधनाच्या बाबतीत ते मागे पडले. याचबाबत त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे. (mushtaq khan welcome movie)
मुश्ताक खान यांच्याबरोबर नक्की काय घडलं?
गेल्या ४५ वर्षांपासून मुश्ताक चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. ‘वेलकम’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका तर प्रचंड गाजली. ‘वेलकम’मध्ये ते भलतेच भाव खाऊन गेले. पण मानधनाबाबत त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही. अक्षय कुमारच्या स्टाफला त्यांच्यापेक्षा अधिक पैसे मिळाले. मुश्ताक यांनी स्वतःच याबाबत सांगितलं. इतक्या नावाजलेल्या कलाकाराबरोबर ही घटना घडणं म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का आहे.
‘वेलकम’मधून कमी पैसे मिळाले तेव्हा…
फिल्मी मंत्राला दिलेल्या मुलाखतीत मुश्ताक म्हणाले, “एखादं कॉन्ट्रॅक्ट साइन करताना शूटचे दिवस सांगितले जातात. २० किंवा २५ दिवसांचं चित्रीकरण असेल तर त्याचनुसार पैसे मिळतात. पण माझ्याबाबती तसं काहीच झालं नाही”. मुश्ताक यांनी जास्त दिवस ‘वेलकम’साठी शूट करुनही त्यांना हवे तेवढे पैसे मिळाले नसल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांच्या स्टाफपेक्षाही त्यांचं मानधन कमी असल्याचं मुश्ताक यांनी सांगितलं.
आणखी वाचा – “मम्मी, मम्मी…”, लेकीने डोळ्यांदेखत पाहिला आईचा मृत्यू, रील्सच्या नादात पोरकी झाली चिमुकली, Video व्हायरल
अनिल कपूर किंवा अक्षय कुमार यांना याबाबत सांगितलं होतं का? असा प्रश्नही मुश्ताक यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “मी त्यांच्याशी याबाबत कधीच चर्चा केली नाही. त्यांना कधीच सांगितलंही नाही. मी त्यांच्याजवळ फक्त काम करण्यासाठी गेलो होते. याविषयी चर्चा करायला मी तिथे गेलो नव्हतो”. पुढे ते म्हणाले, “तुम्ही एक लाखामध्ये हा चित्रपट करा असं मला सांगण्यात आलं होतं. कितीही दिवस लागले तरी आता तुम्हाला हे काम पूर्ण करावंच लागेल, असं बोलण्यात आलं. अभिनेत्यांच्या स्टाफला दिवसावर मानधन मिळतं. मलाही तसं मिळालं असतं तर अधिक पैसे मिळाले असते”. ३२ कोटींचं बजेट असलेल्या ‘वेलकम’ने तब्बल ११७ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.