Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या सुरुवातीपासूनच घरातील प्रत्येक सदस्य प्रकाश झोतात आला. ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की, भांडण, वाद-विवाद आलेच. पण या नव्या सीझनमध्ये पहिल्याच दिवसांपासून सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. इतकंच काय तर सदस्य दोन आठवड्यांमध्येच हाणामारीवर उतरले. हा संपूर्ण प्रकार पाहता पहिल्याच आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर सुत्रसंचालक रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वादाला तोंड फोडलं. तर इतरही काही सदस्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आरडाओरडा केला. पण या सगळ्यामध्ये गोंधळ, भांडणं न करता चर्चेत राहिलेला स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात रिलस्टार सूरजची एन्ट्री होताच अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्याला शोमध्ये पाहिल्यानंतर अनेकांनी प्रश्नचिन्हही निर्माण केले. हा या घरात येऊन काय करणार?, याला ‘बिग बॉस’मध्ये का घेतलं? असे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आले. आता त्याच सूरजला संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळत आहे. इतकंच नव्हे तर इंडस्ट्रीमधील कित्येक कलाकार मंडळी सूरजला भरभरुन पाठिंबा देत आहेत. अशातच त्याच्या आणखी एका निर्णयाने सगळ्यांचं मन जिंकल आहे.
सूरजला आई-वडील नसल्याचं त्याने याधीच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सांगितलं होतं. आता निक्की, जान्हवीबरोबर गप्पा मारत असताना त्याने त्याचं दुःख बोलून दाखवलं. तसेच आईची आठवण येत असल्याचं सांगितलं. दरम्यान सूरजने त्याच्या लग्नाविषयी भाष्य केलं. तो म्हणाला, “आजी-आजोबा, आई-बाबा मला वरतून बघत असतील. मी माझ्या वडिलांना आप्पा म्हणायचो. आईच्या शब्दामध्ये जी ताकद आहे ती ताकद कोणत्याच शब्दात नाही”.
यापुढे सूरज म्हणाला, “मांडीवर घेऊन ती मला झोपवायची. खूप मायाळू होती. ते दिवस मला खूप आठवतात. उगाच मोठा झालो असं मला वाटतं. जन्म दिला आणि सोडून जातात हे मला खूप वाईट वाटतं. लगेच जायचं असेल तर त्यापेक्षा मग जन्मच द्यायचा नाही. हे मी फक्त माझ्याबाबत नाही सगळ्यांचं सांगत आहे. मी तर बायको म्हणून अनाथ मुलगीच करणार. मी पण अनाथ ती पण अनाथ. नशिबात असेल तेव्हा मिळेल”. सूरज त्याचं दुःख व्यक्त करत असताना जान्हवीलाही अश्रू अनावर होतात. तसेच “तुझं नशीब तू स्वतःच लिही” असं निक्की सूरजला सांगते. यामधूनच सूरज अगदी खरा आणि सच्चा आहे हे या संवादामधून दिसून आलं.