Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. १०० दिवसांचा असणारा हा खेळ आता ७० दिवसांचा असणार आहे. अवघ्या काही दिवसांतच आता हा चर्चेत असणारा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हा शो १०० दिवसांचा नसून ७० दिवसांचा असणार असल्याचं ‘बिग बॉस’ने अधिकृत घोषणा करत सांगितलं. घरातील सर्व सदस्यांना ६ ऑक्टोबरला ग्रँड फिनाले पार पडणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडला नव्हता. दरम्यान ‘बिग बॉस’ने घरात असणाऱ्या सगळ्या ८ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं होतं.
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे आणि वर्षा उसगांवकर हे घरातील आठ सदस्य या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यापैकी आता ‘बिग बॉस’च्या घरातून एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. हा स्पर्धक म्हणजे सर्वांचा लाडका विनोदवीर पॅडी कांबळे. आता पंढरीनाथ कांबळेचा प्रवास ‘बिग बॉस’च्या घरातून संपला असून त्याने घराबाहेर एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – नव्या घरात रुपाली भोसलेने बनवला ‘हा’ पहिला पदार्थ, स्वयंपाकघरही आहे इतकं सुंदर, व्हिडीओ समोर
पंढरीनाथने अगदी पहिल्या दिवसापासून स्वत:चा खेळ सांभाळून सूरजला प्रत्येक अडचणीत खंबीरपणे साथ देत हा खेळ खेळला. पॅडीचा सर्वांना मदत करण्याचा स्वभाव प्रत्येकाला भावला होता. त्यामुळेच महाराष्ट्राभरातून याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील पॅडीला पूर्णपणे पाठिंबा देत भरभरुन मतं देण्याची विनंती प्रेक्षकांना केली होती. शिवाय वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पॅडीचा खुमासदार परफॉर्मन्स पाहून अनेकांनी त्याच कौतुकही केलं.
‘बिग बॉस’च्या घरातील पॅडीची एक आठवण सांगायची झाली तर सातव्या आठवड्यातील पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या खेळामध्ये पॅडी यांनी चपळता दाखवत अरबाज आणि वैभव यांची भंबेरी उडवून लावली. त्याचा हा खेळ पाहून मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव व विशाखा सुभेदार यांनी खास पोस्ट शेअर केली होती. शिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनेदेखील पॅडी कांबळेचं कौतुक केलं.