Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत असून घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’प्रेमींच्या हा सीझन पसंतीस उतरत आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीने ‘कलर्स मराठी’वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. जान्हवीने जीवनात खूप संघर्ष केला आहे. अगदी बॅकग्राउंड डान्सर ते मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत जान्हवीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
जान्हवीचं मालिकाविश्वातील आयुष्याची जितकी चर्चा आहे तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळते. जान्हवीच्या पतीचं नाव किरण किल्लेकर आहे. जान्हवी व किरण यांचा प्रेम विवाह आहे. डान्स क्लासमध्ये त्यांची ओळख झाली होती. कमी वयात जान्हवी व किरण यांनी लग्न केले. जान्हवीला आठ वर्षाचा मुलगा देखील आहे. जान्हवीच्या लाडक्या लेकाचे नाव इशान किल्लेकर असे आहे. सोशल मीडियावर जान्हवी नेहमीच इशान बरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.
सध्या जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. मालिकेत खलनायिका म्हणून वावरणारी जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरातही व्हिलन ठरली. बिग बॉसच्या घरात वयानं मोठ्या असलेल्या वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांचा अपमान केल्यानं जान्हवी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. त्यामुळं इंडस्ट्रीतल्या इतर सेलिब्रिटींनीही तिच्यावर टीका केली आहे. जान्हवीचे तिच्या कुटुंबियांवर भरपूर प्रेम आहे. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर आता जान्हवी तिच्या लेकाला मिस करताना दिसत आहे.
नुकताच जान्हवीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यांत जान्हवी लेकाची आठवण काढताना दिसत आहे. जान्हवी सहस्पर्धकांसह तिच्या लेकाच्या आठवणी शेअर करताना दिसत आहे. जान्हवी म्हणते, “पाऊस पडला की मला इशान शाळेत गेला असेल की नाही याची काळजी वाटते. शाळा घरापासून जवळ आहे. तरीसुद्धा त्याचा बाबा त्याला गाडीनेच शाळेत सोडायला जातो. त्याच्या बाबांचा दिवसचं त्याच्यापासून सुरु होतो आणि संपतो. सकाळी उठल्यावर शाळेत सोडतो. सहा तासांत त्याचा बाबा त्याची काम करुन घेतो. शाळेतून आल्यावर ट्युशनला सोडतो. ट्युशनवरुन आल्यावर त्याला फुटबॉलच्या क्लासला घेऊन जातो. तर आई जेवण करतात. इशानला त्याचा बाबाचं झोपवतो. आणि तो इतका मोठा झाला आहे तरी इशान त्याच्या बाबाच्या मांडीवरचं झोपतो”.