Abhijeet Sawant depression : ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिजीत सावंत नेहमीच त्याच्या गायनाने साऱ्यांना मंत्रमुग्ध करत आला आहे. इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिजीत सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आजवरची अभिजितची सगळीच गाणी गाजली. पण तरुणपणात अभिजीतला डिप्रेशनचा मोठा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतने त्याच्या डिप्रेशनच्या काळाबाबत भाष्य केलं. यावेळी तो यातून कसा बाहेर आला याबाबतही त्याने स्पष्टपणे भाष्य केलं.
अभिजीतने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. याबाबत बोलताना अभिजीत म्हणाला, “खरं म्हटलं गेलं, तर माझं तारुण्यही खूप डिप्रेसिंग होतं. कारण मी शिक्षणात फार चांगला नव्हतो. त्यामुळे त्याबद्दल कायम एक प्रेशर होतं. आई-वडील आणि समाजाचंसुद्धा एक प्रेशर होतं. मित्रांमध्येही ते प्रेशर जाणवायचं. कुणाला ७० टक्के मिळत होते, तर कुणाचं मी या कॉलेजला जाणार, त्या कॉलेजला जाणार, याबद्दलची चर्चा असायची आणि माझ्या मनात विचार ‘मी पास होणार की नाही’ हाच असायचा”.
आणखी वाचा – “मराठी शाळेची अवस्था…”, अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझं कुठेच काहीच अडलं नाही कारण…”
पुढे तो म्हणाला, “तुम्ही समाजात ज्या लोकांबरोबर राहता, जो समाज तुम्हाला तुमच्या भविष्यातील आयुष्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. तो समाज कसा आहे, तेही महत्त्वाचं आहे. पण, तुम्ही जर एखाद्या अशा समाजात राहताय, जिथे अभ्यास न करणारा मुलगा ‘गुड बॉय’ नाही, अशा पद्धतीनं विचार करणारा असेल, तर त्याचं वाईट वाटतं. म्हणून कधी कधी स्वतःबद्दलसुद्धा शंका निर्माण व्हायची. त्यामुळे तेव्हा असं वाटायचं की, लवकर मोठा झालो, तर बरं होईल”.
शेवटी अभिजीत म्हणाला, “अभ्यास किंवा इतर शैक्षणिक गोष्टी मला जमत नाहीत; पण त्या कराव्या लागत होत्या. त्यामुळे यातून कधी बाहेर पडतोय, असं वाटायचं. म्हणून तो काळ खूप कठीण, मानसिकरीत्या अस्वस्थ करणारा आणि भीतीदायक होता. पुढे अभिजीतने सांगितलं, “त्या काळात तुम्हाला बाहेरचे लोक बोलत असतात. पण जेव्हा घरातले लोकसुद्धा बाहेरच्यांसारखं बोलतात. तेव्हा त्याचा आणखी त्रास होतो. अर्थात, आपल्याकडून अपेक्षा असतातच. पण ज्यांनी आपल्याला सांभाळलं, आपल्याला लहानपणापासून बघितलं तेपण असं म्हणाले, तर मग कुणाकडे जायचं? आता आपण म्हणतो की, मुलांच्या आयुष्यात काही चांगलं होत नसेल, तर त्याला आई-वडील जबाबदार आहेत; पण तेव्हाचा समाज असा विचार करणारा नव्हता. तेव्हा समाज मुलगा किंवा मुलगी शिकली नाही म्हणजे मुलांचाच दोष असणार असा विचार करायचे. पण त्या मुलाला किंवा मुलीला समाज समजून घेतच नाही”.




