Dhananjay Powar On Santosh Juvekar : ‘छावा’ चित्रपटाची आज जितकी चर्चा रंगलेली पाहायला मिळाली त्याहून अधिक तर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसला. मात्र चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अथक प्रयत्नाने हा वाद मिटवला. यानंतर आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे चित्रपटातील कलाकारासह झालेले ट्रोलिंग. ‘छावा’ या चित्रपटात एकूणच दमदार स्टारकास्ट पाहायला मिळाली. या चित्रपटात अनेक बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकारांची वर्दळही पाहायला मिळाली. चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये छाप पाडली. मराठमोळ्या अभिनेत्याची बिग बजेट चित्रपटातील वर्णी पाहता त्याचं भरभरुन कौतुकही झालं.
मात्र, रायाजी ही भूमिका साकारणारा संतोष गेले काही दिवस सोशल मीडियावर सतत ट्रोल होताना दिसत आहे. हो आणि याचे कारण म्हणजे संतोषने या चित्रपटातील किस्से सांगत अनेक मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्य. “‘छावा’ सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाशी मी सेटवर बोललो नाही”, “सेटवर विकीला माझ्याशिवाय करमत नसायचं”, या काही वक्त्यव्यांमुळे संतोष ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकला. संतोषची ही वक्तव्ये नेटकऱ्यांना खटकली आणि याचे अनेक व्हिडीओ, मिम्स बनून व्हायरल होऊ लागले. यावर अनेक कलाकार मंडळींनी संतोषने केलेल्या वक्तव्यांची बाजू सांभाळत भाष्य केलं आहे. अवधूत गुप्तेने पोस्ट शेअर करत संतोषसाठी झालेलं ट्रोलिंग पुरे आता त्याला सांभाळून घ्या असं म्हटले आहे. यापाठोपाठ आता ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारने संतोष बरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे.
धनंजय पोवारची संतोष जुवेकरसाठी खास पोस्ट
“संतोषला मी खूप वर्षांपासून ओळखतो. तो मनाने खूप निखळ आहे. सध्या ट्रोल होतोय पण तुम्ही त्याला चुकीचा समजू नकात. खूप साध्या विचारांचा आहे. मनाने पूर्ण मराठी संस्कृती जपणारा आहे. आशा करतो तुम्ही सगळेच हे बंद कराल”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, दाखवली लेकाची झलक, नावही ठेवलं एकदम खास
या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत संतोषची वाजू उचलून धरली आहे.”ट्रोलिंग चालू ठेवलं तरी कोणाला फरक पडतो. हल्लीं ट्रेण्डच आला आहे. सेलिब्रिटी लोक पकडा आणि त्यांच्यावर तोंडसुख घ्या. कोंबड आरवल नाही तरी तांबड फुटायच राहत नाही”, “भारतात ट्रोलिंग हा एक प्रसिद्धीचा भाग आहे”, “आपल्याला हे समजल पाहिजे की मुलाखतीत संतोष सर अक्षय खन्ना बद्दल नाही तर त्याच्या पात्राविषयी बोलत होते. त्या भूमिकेत असल्यामुळे त्याच्याबरोबर बोलले नाही. मला वाटतं लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. अनाजीपंत भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल पण आपल्याला रोष होता. त्या कलाकाराबद्दल नाही तर त्या भूमिकेबद्दल”, असं म्हणत संतोषला पाठिंबा दर्शविला आहे.