छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या कार्यक्रमातून सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. गेल्या काही दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. सईच्या कुटुंबात चिमुकलीचं आगमन झालं आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिचं नावही समोर आलं आहे. (Sai Lokur Baby Name)
२०२१च्या नोव्हेंबरमध्ये सईने तीर्थदीप रॉयबरोबर थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. त्यांनतर २०२३ मध्ये सई व तीर्थदीप आई-बाबा झाले. आपल्या बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी सईने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यानंतर सईने खास फोटोशूट करत गरोदर असल्याचं सांगितलं. दरम्यान सईच्या खास डोहाळ जेवणाचे फोटो समोर आले. सईच्या डोहाळ जेवणाचेही बरेच फोटो सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरले. सईच्या कुटुंबीयांनी व मैत्रिणींनी तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला.
सईच्या बाळाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान सईने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सईने तिच्या बाळाचे पाय तिच्या व पतीच्या हातात घेत एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टद्वारे सईने तिच्या बाळाची नव्याने ओळख करुन दिलेली पाहायला मिळत आहे. चाहते सईच्या बाळाचं नाव काय आहे याकडे लक्ष देऊन होते. अशातच तिच्या लेकीला एक वर्ष पूर्ण होताच सईने तिच्या बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे.
इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने, “आणि अशाप्रकारे आज आपण एक महिन्याचे झालो आहोत. आमच्या आनंदाचा आज आम्ही सर्वांना परिचय करून देत आहोत, आमच्या बाळाचे नाव ताशी (TASHI)रॉय ठेवलं आहे. माझ्या प्रियेला एक महिना झाल्याच्या खूप शुभेच्छा. आम्हाला तुझे पालक म्हणून निवडल्याबद्दल आणि तुझे असण्याचा विशेषाधिकार दिल्याबद्दल धन्यवाद. तू आम्हाला मिळालेला जगातील सर्वात सुंदर आशीर्वाद आहेस. Tashi म्हणजे समृद्धी व शुभ” असं म्हणत तिच्या बाळाचं नाव सांगितलं आहे. सईच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या बाळाच्या हटके नावाचं कौतुक केलं आहे.