Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एका मागोमाग एक स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. स्पर्धकांमधील सततचे वाद, भांडण, हाणामाऱ्या आता आणखी कोणतं वळण गाठणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी या पात्राने तुफान राडा घातलेला पाहायला मिळाला. निक्कीची अरेरावी आता घरातील स्पर्धकांबरोबर प्रेक्षकांनाही खटकु लागली असल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे या दिग्गज कलाकारांचा केलेला अपमान साऱ्यांनाच खटकला.
यावरुन रितेशने भाऊच्या धक्क्यावर निक्की यांची चांगलीच शाळा घेतली. या सर्व प्रकरणानंतर कोणतीही सुधारणा न करता वाटेल ते, तोंडात येईल ते बोलत सुटत निक्की तांबोळीने घरातील सदस्यांना खडेबोल सुनावले. यावेळी स्पर्धकांच्या वडिलांवरुनही निक्कीने भाष्य केलं. स्पर्धकांचा बाप काढणं हे कितपत योग्य आहे असे म्हणत निक्कीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावरुन आता येणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर निक्कीची चांगली शाळा घेतली जावी अशी विनंती ही प्रेक्षकांनी केलेली दिसली.
निक्कीने स्वत:साठी केलेल्या चहाची भांडी घासण्यास नकार देताच घरात मोठा वाद झाला. आर्याने नंतर ही भांडी उचलून निक्कीच्या बेडवर ठेवली. तरीही निक्की ऐकली नाही म्हणून आर्याने शेवटी उरलेली भांडी उचलून लपवली. यानंतर झालेल्या भांडणात निक्कीने आर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली. यावर आर्याने प्रचंड संतापून “बाप काढायचा नाही…” असं स्पष्टपणे सांगितलं. घराचा कॅप्टन सूरज असल्याने त्याने देखील आर्याला पाठिंबा दिला.
आणखी वाचा – “त्याला चांगलं खेळण्याची गरज”, सूजर चव्हाणला गायत्री दातारचा सल्ला, म्हणाली, “पहिला चांगलं खेळायचा आता…”
हे प्रकरण इतकं तापलं की भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा सुनावण्यात आली. नुकताच याचा एक प्रोमो समोर आला आहे यामध्ये रितेश निक्कीवर भडकलेला दिसत आहे. रितेश निक्कीला म्हणत आहे की, “निक्की, कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही ही अशा प्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही घराच्या कॅप्टन होणार नाही”. अर्थात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला आणखी एक शिक्षा देणार असल्याचं देखील रितेशने यावेळी सांगितलं. आता ही दुसरी शिक्षा कोणती असेल याचा उलगडा आज होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर होईल.