Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाने प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस हा शो अधिकाधिक रंजक बनत आहे. या शोच्या प्रत्येक भागामध्ये नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’ या स्पर्धकांना नवनवीन टास्कसुद्धा देत आहेत. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा होत आहे. सतत एकमेकांचे वादविवाद होताना दिसत आहेत. नुकतंच वर्षा उसगांवकर आणि पॅडी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर शुक्रवारच्या भागात पॅडी व सूरजमध्येही काही कारणामुळे मतभेद झाले. ज्याबद्दल सूरजला वाईट वाटलं. त्यामुळे अंकिताने सूरजची समजूत काढली. मात्र पुन्हा एकदा पॅडी यांनी सूरजला शुक्रवारच्या भागात डान्स करताना अडवल्यामुळे सूरज आणखी दुखवला गेला. (Bigg Boss Marathi 5 Netizens Comments)
गुरुवारी झालेल्या भागाच्या शेवटी ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला होता. तेव्हा त्या टास्कदरम्यान, पॅडी टास्क समजावून सांगत असताना सूरज मध्ये बोलत असतो. त्यामुळे पॅडी त्याला अडवतात आणि मध्ये बोलू नको असं म्हणतात. यामुळे सूरज दुखावला जातो आणि नाराज होतो. तेव्हा अंकिता त्याची समजूत काढते. यावेळी अंकिता सूरजला समजावत म्हणाली की, “तू असं कसं म्हणालास त्यांना की मला सांगू नका माझं काय करायचं ते… असं बोलणं चांगलं आहे का? असं नाही बोलायचं…” यावर सूरज असं म्हणतो की, “मी माझं सांगितलं. मी बोलत असताना ते मध्ये बोलले म्हणून मी बोललो. नाही तर मी असं मध्ये कुणाला काही बोलत नाही”.
अशातच शुक्रवारच्या भागात अभिजीतने साडी नेसून केलेल्या टास्कमध्येही डान्स करत असताना सूरज मध्ये मध्ये येतो आणि यामुळेही पॅडी त्याला अडवतात. यामुळे आधीच दुखावलेला सूरज आणखी नाराज होतो. यावेळी तो डीपीकडे आपली नाराजी व्यक्त करतो. तेव्हा त्याला अंकिता, अभिजीत, डीपी आणि संग्राम असे सगळेच सदस्य समजावतात. तेव्हा सूरज आता मी एकटा गेम खेळणार असल्याचेही भाष्य करतो. याबद्दल आता सोशल मीडियावर काही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. काही नेटकरी सूरजने समजून घेतलं पाहिजे असं म्हणत आहेत. तर काही नेटकरी अंकिता व पॅडी यांनाच सुनावत आहेत.
नेटकऱ्यांनी “अंकिताला कंत्राट दिलंय का? सतत सूरजला शहाणपणा शिकव असते. मूर्ख मुलगी”, “सूरजला अडवु नका त्याला त्याच खेळुदे”, “अंकिता आणि पॅडी सूरजचा पूर्ण वपर करत आहेत. या सुरजचा रस्ता साफ करतील वाटतं”. “अति शहाणी मुलगी आहे ही अंकिता”, “अंकिता ही फक्त दुसऱ्यांवर टीका करु शकते, यामुळे आम्हाला तू खरी नाही वाटतं”, “ही एका दिवशी सूरजला बाहेर काढेल” अशा अनेक कमेंट्सद्वारे सुनावलं आहे. तर काहींनी “प्रत्येक जण अंकिताला स्वार्थी बोलतात, पण ती आणि पंढरीनाथ जर नसते तर सुरज इथपर्यंत येऊ शकला नसता. कारण त्याला काही गोष्टी समजत नाही आणि यामुळे त्याने स्वतःच माघार घेतली असती”, “सूरज साधा आहे जास्त बोलत नाही, काही गोष्ट त्याला पटली नाही तर तो पहिल्यांदा बोलला आहे तर लगेचच राग नाही आला पाहिजे”, “सुरज जर काही चुकीचं वागला तर त्याला समजून सांगा”, “विनाकारण त्याला उद्देश देत आहे”. “मूर्ख अंकिता तो फक्त नाचत तर होता ना त्याने घरात चुकीचं बरंच काही घडतं तेव्हा बाकीच्या सदस्यांना नाही बोललं जात” अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, शुक्रवारच्या भागात अभिजीतने सूरजची समजूत काढली आणि त्याच्या मनात असलेला गैरमसज काढला आहे. यावेळी त्यांनी सूरजला चॉकलेटदेखील दिलं. तसंच एपिसोडच्या शेवटी पॅडी, अंकिता, अभिजीत यांनी एकत्र येत त्याची समजूत काढली. यावेळी सूरजनेही त्याची चूक लक्षात घेत आपण केलेली वागणूक चुकीची होती असं म्हटलं. त्यामुळे आता पुन्हा सूरज, अंकिता, पॅडी, अभिजीत व डीपी या ग्रूपमध्ये आलबेल झाले आहे.