‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला व नवीन सीझनमधील स्पर्धकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये नेते, अभिनेते व रीलस्टार्सने प्रवेश केला असून गावखेड्यातील रील स्टार्सही ‘बिग बॉस’च्या घरात आले आहेत. यात अंकिता, धनंजय, घन:श्याम व सूरज यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर यांना त्यांच्या चाहत्यांकडून तुफान पाठींबा मिळत आहे. सूरज चव्हाणच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. त्याच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांकडूनही कौतुक केलं जात आहे, उत्कर्ष शिंदे पाठोपाठ किरण मानेंनेही ‘बिग बॉस’च्या घरातील सूरज, घन:श्याम व धनंजय यांचे कौतुक केलं आहे. किरण मानेंनी या तिघांसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यांचे कौतुक केलं आहे व त्यांना पाठींबादेखील दिला आहे. (Bigg Boss Marathi 5 Kiran Mane Post)
किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी माझं प्रेम आणि पाठींबा या तिघांना रहाणार. तिघं गांवच्या मातीतली आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी ‘सो कॉल्ड’ सभ्य-असभ्यता, संस्कृती-फिंस्कृती, शुद्ध-अशुद्धता उंच कोलून, रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेली आहेत. इथेही ते जे काहीही कसेही वागतील ते ‘रिअल’ असणार. या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी. तिघंही खूप भारी आहेत. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही. आपली इच्छा नाही आणि लायकीही नाही आणि ठामपणे सांगतो, मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाचवेळी जे काही करत आहे तोही त्यांच्या सोडाच, मनोरंजन इंडस्ट्रीत नव्याजुन्या कुणाच्याच तोंडचा घास नाही, दम नाही. फरक असतो. कुणाला गंमतजंमत करणारी रील्स करून फॉलोअर्स मिळतात, तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करुन”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “खोटं वागणार्या आणि माकडचाळे करणार्यांचं ‘बिग बॉस’मध्ये माकड होतं. हे चार वर्षांपुर्वी माझं मत होतं. पुर्वी मी ‘बिग बॉस’च्या सीझन दोनची ऑफर नाकारली होती, हा त्याचा सणसणीत पुरावा! बाकी धुणीभांडी करण्याला मी कमीपणाचं मानत नाही. ‘बायकांची कामे’ मानून अशा कामांना हिणवणारे बुळगे नामर्द असतात. असो, सीझन चार स्विकारला. कारण, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मी मोदीवर टीका करणारी पोस्ट केली. भक्तडुक्कर पिलावळीनं उच्छाद मांडला. मला मालिकेमधुन काढुन टाकलं गेलं. आज मी जिद्दीनं पायर्या चढत शत्रूंची थोबाडं ठेचत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं वलय कितीतरी पटींनी वाढवलं. यासाठी माझ्या चाहत्यांसमोर मी नम्रच आहे. याचबरोबर बिगबॉस माझ्यासाठी गॉडफादर ठरलं. इथं माकड केलं जात नाही. बिगबॉस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकड”.
यापुढे किरण माने यांनी असं म्हटलं आहे की, “ग्रामीण भागातली जनता पहिल्यांदा ‘बिग बॉसकडे’ वळली आणि मला अभूतपुर्व प्रेम दिलं. माझ्याहून निम्म्या वयाच्या पोरांना धोबीपछाड देत थेट टॉप तीनपर्यंत मजल मारू शकलो ते यामुळेच. गांवोगांवी मिरवणुका निघाल्या. ‘बिग बॉस’ पब्लिक विनर किरण माने’ अशा रांगोळ्या काढल्या गेल्या. ‘बिग बॉस’च्या घरातही मी रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग अर्थासहित सांगणे. गौतम बुद्ध, छत्रती शिवाजी महाराज, जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक गोष्टी सांगणे, या जगावेगळ्या गोष्टी केल्या. हे ‘बिग बॉस’मध्ये कधीच घडलं नव्हतं आणि खात्रीनं सांगतो, यापुढंही हे घडणार नाही. असो. तर, धनंजय, घन:श्याम आणि सूरज… माझ्या मातीतल्या माझ्या बहुजन भावांनो, तुम्ही तुमच्या शैलीने धुमडी उडवा त्या घरात, चिखलात, धुरळा पान्यात आग लावा. पुंग्या टाईट करा एकेकाच्या. तुम्हा तिघांनाही खूप खूप प्रेम”.