Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीला खूपच महत्त्व आहे. कारण कॅप्टन बनल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जायच्या नॉमिनेशनमधून सुरक्षा मिळते. तसंच या घरातील काही विशेषाधिकारही मिळतात. त्यामुळे या घरात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी कॅप्टन्सीचा टास्क हा प्रत्येक स्पर्धकांकडून चांगला खेळला जातो. अशातच या घराला आता एक दिलदार व्यक्तीमत्व कॅप्टन म्हणून मिळणार आहे आणि हे व्यक्तीमत्व म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गोलीगत किंग सूरज चव्हाण नवीन कॅप्टन बनला आहे. नुकताच तो कॅप्टन झाल्याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Captain)
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन प्रोमो आऊट झाला असून यामध्ये कॅप्टन्सी कार्याची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे.
सूरजच्या या नवीन प्रोमोसह असं म्हटलं गेलं आहे की, “झापूक झूपूकचे ब्रँड अँम्बेसेडर, गोलिगत आहे ज्यांचं जिगर, सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरजभाऊ चव्हाण झाले आहेत कॅप्टन”. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे. तसंच त्याचं अभिनंदन करत असल्याचेदेखील या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या गुरुवारच्या भागात पार पडलेल्या कॅप्टन्सी कार्यात एकूण चार सदस्य हे कॅप्टन्सी पदाचे दावेदार होते. यात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे चार स्पर्धक होते. अशातच आता सूरज या घरचा नवीन कॅप्टन बनला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे.