Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे आता जवळपास आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. म्हणजेच या शोने दोन महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. दोन आठवड्यांनी या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत असल्याची पाहायला मिळाली. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Bigg Boss Marathi 5 Elimination)
या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी घरातून बाहेर कोण जाणार? याविषयीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. सोशल मीडियावर वर्षा उसगांवकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. अशातच काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आणि यातून निक्की व अरबाज हे दोघे डेंजर झोनमध्ये असल्याचे दाखवण्यात आले.
अशातच या घरातून अरबाजने निरोप घेतला आहे. अरबाजने या घरातून निरोप घेणे हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. अरबाज या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे सेफ असेल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता, मात्र हा अंदाज चुकीचा ठरत अरबाजचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. या नॉमिनेशन टास्कदरम्यान, जान्हवीने वर्षा यांची बॅग उघडून सांगितले की त्या सेफ आहेत. मग वर्षा यांनी सूरजची बॅग उघडून सांगितले की सूरज सेफ आहे. मग अरबाजने वर्षा यांची बॅग उघडत त्या सेफ असल्याचे सांगितले. पण कमी मतांमुळे अरबाजचा या घरातील प्रवास संपला असल्याचे ‘बिग बॉस’ने म्हटलं. अरबाज बाहेर जात असल्याचे ऐकताच निक्की ढसाधसा रडू लागली.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग चांगलाच गाजला. आजच्या भागात ‘नवरा माझा नवसाचा २’च्या निमित्ताने सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी व महानायक अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्व स्पर्धकांबरोबर त्यांनी मजामस्ती केली. तसंच पाहुण्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतूक केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.