Bigg Boss Marathi 5 : सध्या टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेतला शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’चा पाचवे पर्व. या कलाकारांचे आपपसात होणार वाद, घरातील काम, गॉसिप्स यामुळे यंदाचे पर्व खूपच चर्चेत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरात एक टास्क रंगला. या टास्कवेळी जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे यांच्यात मोठा वाद झाला. “पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अॅक्टिंग करून थकले आहेत”, असे वक्तव्य जान्हवीने केले. जान्हवीने केलेले हे वक्तव्य घरातील सदस्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी यावरुन जान्हवीला विरोध केला. आता जान्हवीच्या या वक्तव्यावरुन सिनेसृष्टीतील कलाकार संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही मंडळी पॅडी यांना पाठिंबा देत जान्हवीवर टीका करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
जान्हवीने पॅडी यांच्या करिअरबद्दल केलेल्या वक्तव्यावर मराठी सिनेसृष्टीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जान्हवीने पॅडी यांचा अपमान कर्त्यंची अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव, सुशील इनामदार, सुरेखा कुडची आदी कलाकारांनी पॅडी यांच्या अपमानावर भाष्य केलं आहे. तसंच चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी पंढरीनाथ कांबळेची बाजू घेत जान्हवी किल्लेकरवर टीकास्र सोडलं आहे अशातच या पर्वातील माजी स्पर्धक योगिता चव्हाणचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेनेदेखील या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सौरभने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे कि, “आपण काय बोलतोय? कोणाला कितपत आणि कोणत्या थराला जाऊन बोलतोय आणि “कोणाला” बोलतोय याचं तरी भान असावं. आता पुन्हा शनिवारी खाली मान घालून गालातल्या गालात हसून सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. इतकंच काय ते होणार का?” असं म्हटलं आहे. ‘बिग बॉस’च्या मंगळवारच्या भागामध्ये जान्हवीने टास्कदरम्यान पॅडी यांचा अभिनयावरून अपमान केला. जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवतायत”
जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हादेखील जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” अभिनेत्रीच्या या वर्तुणकीचा निषेध आता मराठी कलाकार मंडळी करत आहेत. पंढरीनाथचा अपमान केल्यामुळे तिच्यावर चहूबाजूने टीका होत आहेत. अनेक नेटकरीदेखील सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे त्यांचा राग व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता भाऊचा धक्कामध्ये रितेश जान्हवीला काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.