Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एका मागोमाग एक धक्के प्रेक्षकांना व स्पर्धकांनाही मिळताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वैयक्तिक कामानिमित्त रितेश देशमुख हा परदेशात असल्याने यंदाच्या आठवड्याचे एलिमिनेशन हे ‘बिग बॉस’ यांनी स्वतःच जाहीर केलं. सुरुवातीला वैयक्तिक कारणामुळे आणि शारीरिक दुखापतीमुळे ‘बिग बॉस’च्या घरातून वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेने एक्झिट घेतली. संग्राम चौगुलेच्या एक्झिटनंतर ‘बिग बॉस’ने नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना एलिमिनेशनसाठी ऍक्टिव्हिटी रुममध्ये बोलावलं. वर्षा, सूरज, जान्हवी, निक्की व अरबाज या पाच सदस्यांपैकी कोणत्यातरी एका स्पर्धकाला ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपवावा लागणार असल्याचं समोर आलं.
या पाच सदस्यांपैकी सर्वात कमी मतं मिळालेल्या स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागला तो स्पर्धक म्हणजेच अरबाज पटेल. अरबाजच्या नावाचं एलिमिनेशन जाहीर केल्यावर निक्कीला ढसाढसा रडू आलं. अश्रू अनावर न झाल्याने निक्की अरबाजला घट्ट अशी मिठी मारुन रडू लागली. ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की व अरबाज यांची मैत्री पहायला मिळाली. अनेकदा त्यांच्यात वादही झालेले दिसले. मात्र त्यांच्यातील वाद मिटवून ते एकत्र आलेले पाहायला मिळाले आणि एकत्र खेळ खेळताना दिसले. अरबाजच्या एलिमिनेशनच्या घोषणेनंतर निक्की हतबल झालेली पाहायला मिळाली. अरबाजला काढू नका अशी विनंती ही ती अगदी शेवटपर्यंत करताना दिसली मात्र नियमानुसार अरबाजला बेघर व्हावे लागले.
आणखी वाचा – “अभिजीतच दोन्ही टीमला फसवतो”, संग्रामने सांगितलं घरात नक्की काय घडतं?, म्हणाला, “स्वतःला सेफ करण्यासाठी…”
अरबाज बाहेर झाल्यावर निक्की कसा खेळ खेळणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अशातच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये निक्की प्रचंड बिथरल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी सूरज निक्कीला धीर देतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सूरज निक्कीला म्हणतो, “तुझं कोणी नाही ना पण मी आहे”. यावर निक्कीही मान्य करते की, “हो तू आहेस”. यावर सूरज निक्कीला समजावतो की, “एकत्र बसायचं”. यावर निक्की म्हणते, “तुझ्याबरोबर बसली आहे. कधी कोणासमोर हात जोडून भीक नाही मागितली की घरात थांबा”. यावर सूरज निक्कीला म्हणतो, “नाही आता रडायचं नाही, खंबीर व्हायचं”.
यावर निक्की म्हणते, “हो मी मनापासून खंबीर आहे पण दुःख कायम आहे. आणि हे दुःख घेऊन पुढे कसं जायचं”. तेव्हा सूरज निक्कीला समजावत म्हणतो, “आपल्या भावना या आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात. आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून गेला आहे”. यावर निक्की म्हणते, “यापुढचा प्रवास कठीण आहे”. तेव्हा सूरज म्हणतो, “आपण एकटं आलो आहोत आणि एकट्याने घरी जाणार आहोत. आता गेमवर फोकस करायचा. खोटं बोलत नाही, मी रडणार, मलासुद्धा भावना आहेत पण इथे एकट्यानेच खेळायचं”. यावर निक्कीही सहमती दर्शविते. त्यावर सूरज म्हणतो, “मग स्वतःला त्रास करुन घ्यायचं नाही”, असं म्हणत तिची समजूत काढताना दिसतोय.