Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आर्या जाधवला घराबाहेर काढलं आहे. निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर ‘बिग बॉस’ने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला. (Aarya responded to Nikki’s mother)
आर्याने निक्कीला मारल्यानंतर निक्कीच्या आईने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी निक्कीच्या आईने असं म्हटलं होतं की, “आर्याने निक्कीला शारीरिक इजा केली आणि ही गोष्ट निंदनीय आहे. ‘बिग बॉस’ने यांची गंभीर दाखल घ्यायला हवी. आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याबरोबर रोजचं असं काहीतरी घडत आहे”. पुढे निक्कीच्या आईने थेट ‘बिग बॉस’लाच जाब विचारत “आमची मुलगी ‘बिग बॉस’च्या घरात मार खायला गेली आहे का?” असं म्हटलं होतं. शिवाय आर्याबद्दल त्यांनी “‘बिग बॉस’ला माझी हात जोडून विनंती आहे की, माझ्या मुलीला शारीरिक संरक्षण मिळालं पाहिजे” असंही म्हटलं. यावर आता आर्याने तिची भूमिका मांडली आहे.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी
याबद्दल बोलताना आर्या असं म्हणाली की, “निक्कीची आई म्हणते माझी मुलगी इथे मार खायला आली आहे का? त्यांना मी सांगू इच्छिते की, काकू इतर मुलीही इथे मार खायला आल्या नाहीत. आम्हीही तिथे मार खायला गेलो नव्हतो. तिनेही मला धक्काबुक्कीमध्ये कानाखाली मारली. त्यावर माझी ती कानाखाली मारण्याची प्रतिक्रिया निघाली. मला जेव्हा बोलले घराबाहेर जा तेव्हा मी काहीच नाही बोलले. मला घरामध्ये ठेवा असंही नाही बोलले. कारण त्यांचा अनादर झाला असता. मी हात उचलणं पण चुकीचंच होतं. पण याचा अर्थ असा नाही की निक्की बरोबर आहे. आतापर्यंत तिनेही हात उचलला. तिथे कोण कोण हिंसा करत हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. अजूनही माझ्या अंगावर खुणा आहेत”.
आर्याने आज इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन घेतलं होतं. याट तिने तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोबर तिने निक्कीबरोबरच्या बाचाबाचीवरही भाष्य केलं. तसेच निक्की खूप वाईट गेम खेळत आहे. गेम खेळताना सात आठवड्यात मलाही बरेचदा लागलं होतं, असंही आर्या म्हणाली. दरम्यान, हिंसा केल्याप्रकरणी निक्कीला मारल्याबद्दल ‘बिग बॉस’ने आर्याला घरातून निष्कासित केलं. आर्याने केलेल्या कृतीनंतर सोशल मीडियावर काही चाहते आर्याचं समर्थन करताना दिसले होते, तर काहींनी या कृतीचा निषेध केला होता.