Bigg Boss 18 Evicted Contestant Nyrraa Banerji : ‘बिग बॉस १८’ मधून बाहेर पडल्यानंतर नायरा बॅनर्जीने करणवीर मेहराबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सलमान खानसाठीही बोल लगावत तिचा राग शिल्पा शिरोडकरवर काढला. नायरा बॅनर्जी घरातून बाहेर पडलेली तिसरी स्पर्धक ठरली. नुकत्याच झालेल्या डबल एलिमिनेशनमध्ये तिला ‘बिग बॉस १८’ मधून एक्झिट घ्यावी लागली. नायरा बॅनर्जीने आश्चर्य व्यक्त करत असं म्हटलं की, ‘तिला शोमध्ये फार कमी स्क्रीन वेळ देण्यात आला. शिवाय या एलिमिनेशनमुळे अभिनेत्रीला खूप मोठा धक्का बसला’.
नायरा बॅनर्जी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाली, “मला मोठा धक्का बसला आहे. माझा स्क्रीन टाइम इतका कमी आहे हे मला माहीत नव्हते. हे खरोखरच विचित्र होते. सलमान खानच्या फीडबॅकच्या आधारे स्पर्धकांनी माझ्याबद्दल चुकीचे मत बनवले. हे त्यांनी केलेले गृहीतक होते आणि ते पक्षपाती होते”. याआधी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने नायरा बॅनर्जीला इशारा दिला होता, अशी माहिती आहे. नायरा म्हणाली की, “करणवीर लोकांना विनाकारण ट्रिगर करतो”. ती म्हणाली, “करण जिममध्ये विचित्र कमेंट करत असे कारण मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. पण मला त्याच्याशी असं जोडायचं नव्हतं. जरी त्याने खेळाची सुरुवात चांगली केली असली तरी तो ट्रिगर करत होता”.
तेव्हा ती म्हणाली, “करणवीरचे पुढचे पाऊल काय असेल हे तुम्हाला माहीत नाही का? तो खूप हुशार आहे. जर त्याने योग्य खेळ खेळला तर तो पुढे जाऊ शकतो. पण करणवीरची प्रतिमा तयार झाली आहे. करणवीर विवियनसह असुरक्षित आहे. तो कुटुंबाचा प्रमुख असेल असे त्याला वाटले. पण विवियन व करणवीर दोघांनाही एका टोळीचा ताबा घ्यायचा आहे. तो चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याचा काही उपयोग नाही”.
आणखी वाचा – सूरज चव्हाण प्रचारसभेत, स्टेजवर जाऊन भाषणही केलं, अजित पवारांना पाठिंबा
त्यानंतर नायराने शेहजादा धामीबरोबरच्या तिच्या बॉन्डबद्दल भाष्य केलं. त्यांच्या बॉन्डला अफेअर म्हणून संबोधले जात होते, परंतु अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितले की शहजादा तिचा चांगला मित्र आहे. ती म्हणाली, “प्रिन्स आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही दोघी श्रुतिकाबरोबर खूप वेळ घालवायचो”. नायरा पुढे म्हणाली, “मी पाहिले की शिल्पाजी माझ्यापासून अंतर राखू लागल्या होत्या. मी अविनाशसह तिच्यासाठी भांडले होते. पण मी जास्त त्यांच्याशी संवाद साधला नाही”.